राजकीय

विविध विकास प्रकल्पांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी घेतला आढावा

Commissioner Dr Rajendra Bharud reviewed various development projects


By nisha patil - 6/5/2026 2:56:30 PM
Share This News:



विविध विकास प्रकल्पांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी घेतला आढावा

 

महापालिकेच्यावतीने शहरात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांचा आढावा आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी आज सकाळी घेतला. यामध्ये अंबाबाई मंदिर विकास आराखड्याअंतर्गत सरस्वती टॉकीज येथील बहुमजली पार्किंग इमारत व भक्त निवास संकुल, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, हॉकी स्टेडियम, शाहू मिल येथील राजर्षी शाहू महाराज स्मारक तसेच गाडी अड्डा पार्किंग व्यवस्था या ठिकाणी सध्या सुरु असलेल्या कामाचा आढावा घेतला.


हॉकी स्टेडियम येथे रंगरंगोटीची शिल्लक राहिलेली कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. तसेच किरकोळ राहिलेली सर्व कामे दर्जेदार पद्धतीने व लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. अंबाबाई मंदिर परिसरात पार्किंगची कमतरता लक्षात घेता गाडी अड्डा येथे पर्यायी पार्किंग व्यवस्था सुरू करण्यासाठी मंजूर निधीतून संरक्षक भिंत, कंपाउंड, सोलर लाईट, स्वच्छतागृह, काँक्रीटीकरण, बॅरिकेट्स, दिशादर्शक फलक तसेच पार्किंग मार्किंगचे नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले. नागरिकांना दर्जेदार पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. शेंडा पार्क येथे महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी कोल्हापूरच्या ऐतिहासिक वास्तूंना साजेशी हेरिटेज लूक असलेली उत्कृष्ट इमारतीचे डिझाईन तयार करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. इमारतीला दगडी वास्तूचा आकर्षक लुक देण्याच्या सूचनाही दिल्या.


महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम, नगररचना, प्रोजेक्ट व पाणीपुरवठा विभागासाठी मानधनावर घेण्यात येणारे अभियंते दर्जेदार घेतले जातील. या अभियंत्यांच्या भरती प्रक्रियेत गुणवत्ता व गुणवत्ता क्रमांकाच्या आधारेच निवड केली जाईल. यातील दर्जेदार अभियंते प्रकल्पांसाठी देऊ. शहरातील विकासकामांना गती देण्यासाठी सर्व अभियंत्यांच्या वॉर्डनिहाय स्वतंत्र बैठका घेऊन आढावा घेतला जाणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. यावेळी शहर अभियंता रमेश मस्कर, सहाय्यक अभियंता सुरेश पाटील तसेच कनिष्ठ अभियंता अनुराधा वांडरे उपस्थित होते.


विविध विकास प्रकल्पांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी घेतला आढावा
Total Views: 3