बातम्या

बालसंशोधक अरजित मोरेंच्या वैज्ञानिक दृष्टीला संवादाची जोड

Communication connects child researcher


By nisha patil - 11/19/2025 6:27:48 PM
Share This News:



बालसंशोधक अरजित मोरेंच्या वैज्ञानिक दृष्टीला संवादाची जोड

एनसीएलचे संचालक डॉ. आशिष लेले; ‘जिज्ञासा’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे, दि. १९ नोव्हेंबर २०२५: ‘भारताला २०४७पर्यंत एक 'विकसित देश' बनविण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आणि सर्वच देशवासीयांचे स्वप्न आहे. ही स्वप्नपूर्ती विज्ञान व तंत्रज्ञानाच्या लोकसंवादाशिवाय साध्य होणार नाही. बाल संशोधक अरजित मोरे याने ‘जिज्ञासा’ पुस्तकातून वैज्ञानिक दृष्टीला संवादाची जोड दिली आहे. त्यातून शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल’ असे मत वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एनसीएल) संचालक डॉ. आशिष लेले यांनी बुधवारी (दि. १९) व्यक्त केले.

पुणे येथील एनसीएलच्या सभागृहात शालेय विद्यार्थी अरजित अमोल मोरे याच्या ‘जिज्ञासा: फ्रॉम क्युरिऑसिटी टू क्लॅरिटी’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन संचालक डॉ. लेले व महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्याहस्ते झाले. यावेळी एनसीएलचे शास्त्रज्ञ डॉ. वाफिया मसीह, डॉ. नरेंद्र कडू, डॉ. एम. कार्तिकेयन, डॉ. महेश धरणे, डॉ. राकेश जोशी, डॉ. राजेश गोन्नाडे, डॉ. शुभांगी उंबरकर तसेच महावितरणचे अमोल मोरे, डॉ. संतोष पाटणी,  निशिकांत राऊत यांची उपस्थिती होती. या पुस्तकाच्या लेखनासाठी अरजित मोरे याचे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  लोकेश चंद्र, मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. पी. गोरे, स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या मुख्याध्यापिका प्रणती मित्रा यांनी कौतुक केले आहे.

शालेय विद्यार्थ्यांना प्रयोगशील शिक्षणाची संधी तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगशाळा अनुभव व प्रयोगशीलतेसाठी मा. पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी ‘जिज्ञासा- एक दिवस शास्त्रज्ञ म्हणून’ (One Day as a Scientist) हा उपक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मुंबई येथील शालेय विद्यार्थी अरजित अमोल मोरे याने सीएसआयआरच्या पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमध्ये एक दिवस वैज्ञानिक म्हणून घालवला होता. या अनुभवावर आधारित त्याने ‘जिज्ञासा: फ्रॉम क्युरिऑसिटी टू क्लॅरिटी’ या इंग्रजी पुस्तकाचे लेखन केले आहे.

महावितरणचे संचालक  राजेंद्र पवार यांनी सांगितले की, ‘अरजित मोरे याचे  हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याने वाचले पाहिजे. विद्यार्थी दशेतील वैज्ञानिक कुतूहल व त्याचे नेमके वास्तव याची मांडणी अरजितने लेखनातून केली आहे. त्यातून शालेय विद्यार्थ्यांना संशोधनासाठी निश्चित प्रेरणा मिळणार आहे’. यावेळी सर्व शास्त्रज्ञ व उपस्थितांनी मनोगतातून अरजितच्या जिज्ञासू वृत्तीचे आणि निरीक्षण क्षमतेचे कौतुक केले.

अरजित मोरे हा जिल्हा इन्स्पायर मानक अवार्ड २०२५ व होमी भाभा बालवैज्ञानिक सुवर्णपदक 2024 चा मानकरी आहे. त्याचे तीन संशोधन लेख आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले असून त्याने इल्यूम्ब्रेला (Illumbrella), स्पाईनोगिअर (Spinogear) व गटरगार्ड (Gutterguard) यासारख्या सामाजिक उपयुक्तता असलेले संशोधन विकसित केली आहे.

या पुस्तकातील ११ प्रकरणामध्ये अरजितने डीएनए सिक्वेन्सिंग, सस्टेनेबल केमिस्ट्री, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, पर्यावरण विज्ञान यांसारख्या विषयांचा अभ्यास कसा केला याचे सोप्या भाषेत वर्णन केले आहे. ‘जिज्ञासा’ उपक्रमाचा फायदा व शास्त्रज्ञांनी केलेले मार्गदर्शन कसे महत्त्वाचे ठरले याबाबत त्याने मनोगत व्यक्त केले. लवकरच या पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रकाशित होणार आहे.


बालसंशोधक अरजित मोरेंच्या वैज्ञानिक दृष्टीला संवादाची जोड
Total Views: 32