शैक्षणिक
कंपनी सेक्रेटरी हे रोजगाराचे उत्तम क्षेत्र – मा. कौस्तुभ गावडे
By nisha patil - 8/20/2025 2:46:26 PM
Share This News:
कंपनी सेक्रेटरी हे रोजगाराचे उत्तम क्षेत्र – मा. कौस्तुभ गावडे
कोल्हापूर, दि. 19 : “कंपनी सेक्रेटरी हे एक रोजगाराचे उत्तम क्षेत्र आहे. वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी केवळ सनदी लेखापाल (सीए), बँकिंग किंवा स्पर्धा परीक्षा यामध्येच करिअरच्या संधी न शोधता कंपनी सेक्रेटरी हा देखील एक चांगला पर्याय म्हणून स्वीकारावा,” असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कौस्तुभ गावडे यांनी केले.
विवेकानंद कॉलेजमध्ये आय.क्यू.ए.सी., वाणिज्य विभाग तसेच करिअर कौन्सेलिंग आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
या कार्यक्रमाला सी.एस. मा. जयदीप पाटील प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना कंपनी सेक्रेटरी होण्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम, कायद्याविषयक माहिती तसेच कंपनीच्या दृष्टीने सी.एस. करीत असलेल्या विविध कार्यांची माहिती देत या क्षेत्रात करिअर करण्याचा सल्ला दिला.
कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये आयोजित विविध नोकरीविषयक व व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे आभार श्री. अमित कुमार यांनी मानले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. श्रुती जोशी आणि प्रा. सौ. शिल्पा भोसले यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी डॉ. ए. एल. मोहिते, डॉ. वाय. बी. माने, डॉ. यू. डी. दबडे तसेच ज्युनिअर व सिनिअर कॉलेजचे प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कंपनी सेक्रेटरी हे रोजगाराचे उत्तम क्षेत्र – मा. कौस्तुभ गावडे
|