ताज्या बातम्या
पाच बंगला परिसरातील रस्त्याचे काँक्रिटीकरण ठप्प
By nisha patil - 11/24/2025 11:32:58 AM
Share This News:
कोल्हापूर:- परीखपुलाजवळ सुरू असलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामात पाच बंगला परिसराकडे जाणाऱ्या भागात जलवाहिनीत गळती उद्भवल्याने काम दोन दिवसांपासून ठप्प झाले आहे. गळती दुरुस्त करण्याची जबाबदारी ठेकेदाराची की पाणीपुरवठा विभागाची, यावरून वाद निर्माण झाला आहे. परिणामी, पादचाऱ्यांना दलदलीतून मार्ग काढत ये-जा करावी लागत आहे.
पुलाच्या मध्यवर्ती बसस्थानकाकडील आणि पाच बंगला परिसरातील रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू होऊन महिना उलटला असला तरी कामाचा वेग समाधानकारक नाही. मोठ्या ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण झाले असले तरी इतर ठिकाणी रस्ता खोदलेल्या अवस्थेतच आहे. त्यावर काँक्रीट टाकण्याचे काम सुरू करायचे असतानाच जलवाहिनीतून अचानक गळती झाली. गळतीचे पाणी खोदलेल्या रस्त्यावर पसरल्याने संपूर्ण परिसरात चिखल आणि दलदल निर्माण झाली आहे.
यामुळे काम थांबवावे लागले असून ठेकेदार आणि पाणीपुरवठा विभागामध्ये दुरुस्तीची जबाबदारी कोणाची, यावरून चर्चा सुरू आहे. पाणीपुरवठा विभाग ठेकेदाराने गळती दुरुस्त करावी, असे म्हणत आहे; तर ठेकेदार विभागानेच दुरुस्ती करावी, अशी मागणी करत आहे. गेल्या दोन दिवसांपासून परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.
पूर्वी नगरसेवक राहिलेले संजय मोहिते म्हणाले, “या प्रश्नावर तातडीने तोडगा निघायला हवा. ड्रेनेज पाईपलाईन स्वच्छ करून घेतली तर पावसाळ्यातील मोठा प्रश्नही निकाली निघेल.”
दरम्यान, काँक्रिटीकरणाच्या पहिल्या टप्प्याला अजून वेळ लागणार असून रस्ता वाहतुकीसाठी खुला होण्यासाठी महिनाभर तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यानंतरच पुढील टप्प्याचे काम सुरू होणार असल्याने नागरिकांमध्ये रस्ता किती काळ बंद राहणार याबाबत चर्चा सुरू आहे.
पुलाखालील सांडपाण्याचाही प्रश्न गंभीर आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून बाहेर पडणारे सांडपाणी आणि कचरा पाईपलाईनमध्ये अडकल्यामुळे पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे पुलाखालील रस्ता बराच वेळ पाण्याने भरून राहतो. हा प्रश्न टाळण्यासाठी संबंधित पाईपलाईन तातडीने स्वच्छ करणे आणि कचरा अडवण्यासाठी जाळी बसवणे आवश्यक असल्याचे स्थानिकांचे मत आहे.
पाच बंगला परिसरातील रस्त्याचे काँक्रिटीकरण ठप्प
|