राजकीय

देश काँग्रेसचे पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ टिळक भवनमध्ये शोकसभा संपन्न

Condolences held at Tilak Bhavan in memory of Congress office bearer Yashwant Happe


By nisha patil - 2/5/2026 4:36:44 PM
Share This News:



यशवंत हाप्पे काँग्रेसचे निष्ठावान व कर्मठ कार्यकर्ते: हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ टिळक भवनमध्ये शोकसभा संपन्न.

 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे स्विय सहाय्यक व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ प्रदेश काँग्रेसचे दादर येथील कार्यालय टिळक भवन येथे शोकसभा संपन्न झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश काँग्रेसचे खजिनदार अभय छाजेड, माजी आमदार वजाहत मिर्झा, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील, प्रदेश उपाध्यक्ष राजेश शर्मा, प्रदेश सरचिटणीस ब्रिज दत्त, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, धनंजय शिंदे, विश्वजित हाप्पे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

“काँग्रेसचे पक्षाचे निष्ठावान व कर्मठ कार्यकर्ते अशी यशवंत हाप्पे यांची ओळख होती. वसंतदादा पाटील या हिमालयाच्या सावलीत ते वाढले, तरिही त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. यशवंत हाप्पे यांनी वसंतदादा पाटील यांचे स्विय सहाय्यक म्हणून काम करत त्यांनी काँग्रेस विचार कायम ठेवला, दादांच्या नंतरही त्यांनी हा विचार सोडला नाही. शेवटपर्यंत काँग्रेसच्या विचारधारेशी ते एकनिष्ठ राहिले. निष्ठा, सातत्य, अहंकारविरहीत व सर्वस्व समर्पण भावनेने त्यांनी काम केले. यशवंत हाप्पे यांचा वारसा त्यांचे चिरंजीव पुढे चालवत आहेत. काँग्रेस पक्षाच्या वतीने मी यशवंत हाप्पे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो”, अशा भावना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी व्यक्त केल्या.

 

यशवंत हाप्पे यांच्या आठवणींना उजाळा देत ज्येष्ठ पत्रकार मधुकार भावे म्हणाले की, वसंतदादा पाटील यांची साथ यशवंत हाप्पे यांनी शेवटपर्यंत सोडली नाही. यशवंत हाप्पे यांच्यासारखी निष्पक्ष, निष्ठावान अशी खूप कमी माणसे असतात. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजसिंह व यशंवत हाप्पे यांचा अत्यंत जवळचा स्नेह होता. पंढरपूरच्या वारीसाठी दिग्विजयसिंह दरवर्षी न चुकता येत व मुंबई ते पंढरपूर व पंढरपूर ते मुंबई या प्रवासात यशवंत हाप्पे दिग्विजयसिंह यांच्यासोबतच असत. मध्य प्रदेशमध्ये निवडणुका असल्या की यशवंत हाप्पे आवर्जून भोपाळमध्ये असत. यशवंत हाप्पे यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे मधुकर भावे म्हणाले. प्रदेश काँग्रेसचे खजिनदार अभय छाजेड, नंदाताई म्हात्रे यांनाही यावेळी यशवंत हाप्पे यांच्या आठवणींना उजाळा दिला.


देश काँग्रेसचे पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ टिळक भवनमध्ये शोकसभा संपन्न
Total Views: 13