शैक्षणिक
शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पदवी प्रमाणपत्रांचा गोंधळ
By nisha patil - 12/25/2025 1:09:06 PM
Share This News:
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या ६२व्या दीक्षांत समारंभात पदवी प्रमाणपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी आढळून आल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांमध्ये नावाच्या स्पेलिंगमध्ये चुका, चुकीचे छायाचित्र तसेच उत्तीर्ण झाल्याचे वर्ष चुकीचे असल्याचे प्रकार समोर आले आहेत.
पदवी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर काही विद्यार्थ्यांच्या लक्षात या त्रुटी आल्या. परिणामी, आनंदाच्या क्षणी विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. काही विद्यार्थ्यांना तर दुसऱ्याचे प्रमाणपत्र हातात घेऊन छायाचित्र काढण्याची वेळ आली, ही बाब अत्यंत गंभीर आहे.
पदवी प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांकडून दोन महिने अगोदर अर्ज भरून घेण्यात आले होते तसेच ५०० ते १५०० रुपये शुल्कही आकारण्यात आले होते. अर्ज अचूक असूनही अशा चुका कशा झाल्या, असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागाकडे तक्रार केल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने संबंधित त्रुटी आठ दिवसांत विनामूल्य दुरुस्त करून देण्याचे आश्वासन दिले आहे. स्वायत्त महाविद्यालयांकडून प्राप्त झालेल्या माहितीत त्रुटी असल्यामुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्टीकरण विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पदवी प्रमाणपत्रांचा गोंधळ
|