राजकीय

प्रारूप मतदार यादीतील गोंधळ शिगेला;राज्य निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ, निवडणुकीवरही अनिश्चिततेचे सावट

Confusion over draft voter list at its peak


By nisha patil - 11/27/2025 4:52:36 PM
Share This News:



प्रारूप मतदार यादीमध्ये झालेल्या मोठ्या प्रमाणातील त्रुटींमुळे कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका हद्दीत प्रचंड गोंधळ निर्माण झाला असून, नागरिकांपासून ते राजकीय पक्षांपर्यंत सर्वत्र नाराजीचे वातावरण आहे. हजारो नावे गायब, चुकीची माहिती, स्थानांतरे नोंद न होणे अशा अनेक तक्रारी अल्पावधीतच नोंदल्या गेल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला अखेर माघार घ्यावी लागली आहे.

विरोधी पक्षांकडून—शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे आणि काँग्रेस—शासनाला केलेल्या निवेदनानंतर आज आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेत हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत ३ डिसेंबरपर्यंत वाढवली. तर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याची मुदत देखील १० डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण मतदार यादीचा कार्यक्रम आता २२ डिसेंबरपर्यंत लांबणार आहे.

१४ नोव्हेंबरची मूळ अंतिम मुदत आधी २२ नोव्हेंबरपर्यंत, त्यानंतर २७ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. तरीही २५ हजारांहून अधिक नावांचा तपशील तपासण्यासाठी मिळालेला वेळ अपुरा असल्याचा ठपका पक्ष आणि स्थानिक संघटनांकडून सातत्याने ठेवण्यात आला. प्रारूप यादी जाहीर झाल्यानंतर उघडकीस आलेल्या नव्या त्रुटींनी तर ही मागणी आणखी तीव्र झाली.

सर्व स्तरांवरील या दडपणामुळे राज्य निवडणूक आयोगाने अखेर संपूर्ण कार्यक्रमच पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. मतदार यादीतील सुधारणा आणि दुरुस्त्यांना इच्छुकांना आता श्वास घेण्याइतका वेळ मिळणार असला तरी निवडणूक कार्यक्रमाबाबत मात्र चित्र धूसरच राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित सुनावणीवरच निवडणूक जाहीरातीची तारीख ठरणार असल्याने उमेदवार, राजकीय पक्ष आणि नागरिकांमध्ये अनिश्चितता कायम आहे.

कोल्हापूर व इचलकरंजीतील मतदारांचे हजारो प्रश्न अजूनही अनुत्तरीत असताना, यादीतील गोंधळामुळे महापालिका निवडणुका नेमक्या केंव्हा रंगणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


प्रारूप मतदार यादीतील गोंधळ शिगेला;
Total Views: 16