बातम्या
संविधान बदलण्याची अफवा काँग्रेसने पसरवली; संविधानाचा सन्मान भाजपनेच राखला – खासदार धनंजय महाडिक
By nisha patil - 11/27/2026 8:37:08 PM
Share This News:
संविधान बदलण्याची अफवा काँग्रेसने पसरवली; संविधानाचा सन्मान भाजपनेच राखला – खासदार धनंजय महाडिक
कोल्हापूर : काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानात १०६ वेळा बदल केले. मात्र, भाजप सरकार संविधान बदलणार असल्याची अफवा काँग्रेसने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पसरवली. प्रत्यक्षात भाजप सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाचा सन्मान राखण्याचे काम केले, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.
श्री भास्कराचार्य प्रतिष्ठान आणि कौन्सिल ऑफ एज्युकेशन यांच्या पुढाकाराने शहाजी लॉ कॉलेजमध्ये संविधान गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार महाडिक बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली.
यावेळी महाडिक यांनी डॉ. आंबेडकर यांच्या स्मरणार्थ केंद्र व राज्य सरकारने केलेल्या विविध कामांचा उल्लेख केला. महू येथील जन्मस्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जा, लंडनमधील निवासस्थानाचे आंतरराष्ट्रीय स्मारकात रूपांतर, नागपूरच्या दीक्षाभूमीचा विकास आणि दिल्लीतील निवासस्थानाचे स्मारक अशा उपक्रमांतून भाजप सरकारने आंबेडकरांचा सन्मान केल्याचे त्यांनी सांगितले.
संविधानाचा अभ्यास विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रा. डॉ. भारत खराटे यांनी सांगितले. विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असून, भविष्यात विविध क्षेत्रांत नेतृत्व करताना त्यांना संविधानाची सखोल माहिती असणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात विद्यार्थिनींना संविधानाच्या प्रतींचे वाटप करण्यात आले. प्रा. प्रज्ञा गिरी यांनी संविधानाचे वाचन केले. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विभावरी मोहिते, आफसा खान, ऋचा वारके आणि पूर्वा जांभळे यांचा खासदार महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा. मधुकर पाटील यांनी लोकशाहीचे महत्त्व अधोरेखित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संविधानाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम होत असल्याचे सांगितले. प्रा. सविता रासम यांनी संविधान गौरव दिनाच्या आयोजनातून नव्या पिढीत लोकशाही मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले.
कोल्हापूरचे सुपुत्र रत्नाप्पाण्णा कुंभार यांचा संविधान निर्मिती प्रक्रियेत सहभाग होता, ही कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बाब असल्याचेही महाडिक यांनी सांगितले. यावेळी कलम ३७० हटविणे, तिहेरी तलाकविरोधी कायदा, डीबीटीद्वारे थेट अनुदान, ओबीसी व मागासवर्गीयांसाठीच्या योजना, मराठा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएसमधून सवलती आणि मुलींच्या उच्च शिक्षणासाठी शुल्कमाफी अशा विविध योजनांचाही त्यांनी उल्लेख केला.
कार्यक्रमाला प्राध्यापक, विभागप्रमुख, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संविधान बदलण्याची अफवा काँग्रेसने पसरवली; संविधानाचा सन्मान भाजपनेच राखला – खासदार धनंजय महाडिक
|