राजकीय
काँग्रेसला करवीरमध्ये मोठा धक्का; विश्वास पाटील आणि राजेंद्र सूर्यवंशी पक्ष सोडणार
By nisha patil - 4/11/2025 1:15:58 PM
Share This News:
कोल्हापूर:- कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात नवी हालचाल सुरू झाली आहे. गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष विश्वास (आबाजी) पाटील आणि करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी हे लवकरच काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या दोघांच्या निर्णयामुळे करवीर तालुक्यातील स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विश्वास पाटील आणि राजेंद्र सूर्यवंशी यांनी पुढील आठवड्यात औपचारिक घोषणा करण्याची तयारी सुरू केली आहे. विश्वास पाटील हे करवीर तालुक्यातील दूध संस्थांच्या संघटनांमध्ये प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी गेल्या चार दशकांपासून गोकुळ दूध संघात सक्रिय नेतृत्व केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वाचे निर्णय राबविण्यात आले आहेत.
दुसरीकडे, राजेंद्र सूर्यवंशी हे सांगरुळ परिसरातील लोकप्रिय आणि प्रभावशाली स्थानिक नेते आहेत. पंचायत समितीचे सभापती म्हणून त्यांनी विकासकामांमध्ये सक्रिय भूमिका बजावली होती.
विश्वास पाटील आणि राजेंद्र सूर्यवंशी या दोघांनीही गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसपासून अलिप्त भूमिका घेतली आहे. स्थानिक राजकीय समीकरणांनुसार दोघांचे काही इतर पक्षांशी संपर्क सुरू असल्याची चर्चा आहे. त्यापैकी एकाच्या हाती “धनुष्यबाण” आणि दुसऱ्याच्या हाती “घड्याळ” असे प्रतीकात्मक संकेत स्थानिक पातळीवर दिले जात आहेत, ज्यावरून त्यांच्या पुढील राजकीय दिशेची चर्चा रंगली आहे.
या दोन्ही नेत्यांचा निर्णय काँग्रेससाठी धक्का मानला जात असून, गोकुळ दूध संघ, करवीर तालुका आणि सांगरुळ मतदारसंघातील राजकारणावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बदलामुळे काँग्रेससमोरील अडचणी आणखी वाढतील, अशी शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
काँग्रेसला करवीरमध्ये मोठा धक्का; विश्वास पाटील आणि राजेंद्र सूर्यवंशी पक्ष सोडणार
|