विशेष बातम्या
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मोरजकर महाराज समाधी घाटाचे संवर्धन काळाची गरज
By nisha patil - 9/15/2025 11:47:16 AM
Share This News:
आजरा (हसन तकीलदार):- निसर्गाची मुक्त उधळण करणारा तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव म्हणजे आजरा. अंदाजे 18व्या शतकातील हिरण्यकेशी घाटावरील लक्ष्मणबुवा मोरजकर महाराज समाधी व पुरातन ब्रम्हलिंगेश्वर मिंदीर आहे. शिल्हारकाळातील बांधकाम असल्याचे काही तज्ञाचे मत आहे.
पुरातन बांधकाम असलेले मंदिर, घाट आणि समाधी ऐतिहासिक वारसा जपत आजऱ्याच्या सौंदर्यामध्ये भर टाकत भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे. परंतु आजची अवस्था पाहिली तर या शिळाकडे पुरातत्व व सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. यासाठी या ऐतिहासिक वास्तूंचे आणि शिलांचे जतन करणे काळाची गरज बनली आहे.
रामतीर्थ हे पावन परिसर, व्हिक्टोरिया पूल, जुने तहसील कार्यालय, व्यंकटराव हायस्कुलची जुनी इमारत या सर्व ब्रिटिशकालीन ठेवे आहेत. आणि 18व्या शतकातील फार मोठे संत लक्ष्मणबुवा मोरजकर महाराज यांची समाधी व ब्रम्हलिंगेश्वर मंदिर दगडानी बांधलेले घाट हिरण्यकेशी नदीकाठावर स्थित आहे. सध्या या घाटाची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे.
आजऱ्याचे ऐतिहासिक वारसा जपणारे हे घाट आता अंतिम श्वास मोजत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेकडो वर्षे या घाटाच्या दगडी बांधकामाला धक्का सुद्धा लागला नव्हता परंतु याठिकाणी गणेशविसर्जनावेळी अवजड वाहने घातल्याने या घाटाचे दगडी बांधकाम हलून दगड सूटलेले आहेत. यावर्षी पाऊसही जास्त प्रमाणात असल्याने खालची जमीन नरम झाली होती त्यामुळे या दगडांवर वाहने आणि क्रेन आणल्यामुळे घाटाची दुरावस्था झाली आहे जुनी घडाऊ दगडे पुन्हा जुन्या स्वरूपात बसवली गेली नाहीत तर भविष्यात आपल्या पिढीला अशा ऐतिहासिक वास्तूपासून मुकावे लागणार आहे.
केवळ फोटो आणि चित्रफीत पाहूनच भावी पिढीला समाधान व्हावे लागणार आहे. याठिकाणी आणखीन महत्वाचे म्हणजे हिंदू समाजाची स्मशानभूमी आहे. बहुतांशी हिंदू समाजातील अंत्यविधी या ठिकाणीच पार पडतात. कोणतेही धार्मिक विधी करताना किंवा पुजापाठ करताना पावसाळ्यात किंवा इतर वेळी अडचणी निर्माण होतात. यासाठी येथे एखादा निवारा असणे गरजेचे आहे.
आजऱ्याच्या पहिल्या महिला सरपंच कै.शांताबाई केशव टोपले यांनी याठिकाणी निवारा बांधला होता परंतु आज त्याचीही दुरावस्था झाली आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन पुन्हा हा ऐतिहासिक वारसा लाभलेला घाट टिकवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे अभिषेक रोडगी, गौरव देशपांडे आणि गणेश डोणकर यांनी सांगितले.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मोरजकर महाराज समाधी घाटाचे संवर्धन काळाची गरज
|