राजकीय
मतदारांचा उत्साह पाहता कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा विजय निश्चित : आमदार राजेश क्षीरसागर
By Administrator - 1/15/2026 2:10:06 PM
Share This News:
केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर शहरासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊन मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली असून, याच विकासावर नागरिकांचा विश्वास असल्याने कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचाच विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
शनिवार पेठ येथील पद्माराजे विद्यालय मतदान केंद्रावर आमदार क्षीरसागर यांनी सपत्नीक मतदानाचा पवित्र हक्क बजावत लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदवला. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा सौ. वैशाली क्षीरसागर यांनीही मतदान केले.
मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार क्षीरसागर म्हणाले की, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार कार्यरत असून, लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत आहे. गेल्या पाच वर्षांत कोल्हापूर शहरात विकासाचे वारे वाहत असून हा विकास जनतेने मान्य केला आहे.
त्यामुळे ६५ पेक्षा अधिक जागांवर महायुतीचा विजय होऊन महापालिकेत सत्तांतर होईल आणि विकासाच्या बाजूने नागरिकांनी स्पष्ट कौल दिल्याचे दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. १९४७ पासून २०१४ पर्यंत काँग्रेसने ‘गरिबी हटाव’चा नारा दिला, मात्र प्रत्यक्षात गरिबी हटली नाही. आज त्यांच्या फसव्या घोषणा जनतेच्या लक्षात आल्या असून, राज्यातील २९ महापालिकांमध्ये महायुतीचाच प्रभाव दिसून येईल, असेही आमदार क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.
मतदारांचा उत्साह पाहता कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा विजय निश्चित : आमदार राजेश क्षीरसागर
|