बातम्या
*दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी नदीवर वनराई बंधारा बांधकाम
By nisha patil - 10/15/2026 11:24:27 PM
Share This News:
*दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी नदीवर वनराई बंधारा बांधकाम
*भावेश्वरी शेतकरी गट,सुलगाव यांचा स्तुत्य उपक्रम
*आजरा(हसन तकीलदार): दुष्काळी परिस्थितीवर मात करून पाणीटंचाईची समस्या कमी करण्यासाठी तसेच पाण्याचे संवर्धन व भूजल पातळीत वाढ करण्याच्या उद्देशाने भावेश्वरी शेतकरी गट, सुलगाव ता. आजरा यांच्या वतीने नदीवर वनराई बंधारा बांधण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे.यावर्षी पावसाने दडी मारल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून आजरा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून शासनाने घोषितही केला आहे. परंतु यावर मात करणे काळाची गरज बनली आहे. यासाठीच भावेश्वरी शेतकरी गट, सुलगाव यांनी वनराई बंधारा बांधून पाणी अडवण्याचा आदर्शवत आणि अनुकरणीय प्रयत्न केला आहे.
पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, उपलब्ध जलसाठ्याचा योग्य वापर करणे आणि उन्हाळ्यातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी वनराई बंधारे महत्त्वपूर्ण ठरतात. या उपक्रमामुळे परिसरातील पाणी संवर्धनाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.जलसंधारणातून समृद्ध शेतीचा ध्यास! या संकल्पनेतून भावेश्वरी शेतकरी गटाने राबविलेला हा उपक्रम इतर शेतकरी गटांसाठीही प्रेरणादायी आहे. जलसंधारण, लोकसहभाग आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन यांद्वारे दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे.यासाठी इतरांनीही याचे अनुकरण करणे गरजेचे आहे.
दुष्काळी परिस्थितीत पिकांचे योग्य व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने विभागीय कृषी संशोधन केंद्र शेंडा पार्क,कोल्हापूर येथील शास्त्रज्ञ डॉक्टर कराड यांनी वेबिनारच्या माध्यमातून गटातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आत्माच्या माध्यमातून शेतीशाळा कार्यक्रम आयोजित करून या कार्यक्रमात प्रकाश रावण रिसोर्स फार्मर धामणे यांनी गटातील शेतकऱ्यांना नैसर्गिक पद्धतीने शेती करून सेंद्रिय निविष्ठांचा वापर करून पिकांचे योग्य व्यवस्थापन केल्याने दुष्काळी परिस्थितीत पाण्याच्या अभावी देखील पीक तग धरून ठेवू शकते याबाबत सखोल मार्गदर्शन केले. अमित यमगेकर यांनी शेतीशाळेमध्ये घेण्यात आलेल्या मागील वर्गाच्या विषयांची उजळणी घेतली.
वनराई बंधारा बांधण्यासाठी गटातील सर्व सदस्य, निमंत्रक व अध्यक्ष यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. त्याचबरोबर वनराई बंधरा करण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी,उत्तुर मोहन फुले यांनी मार्गदर्शन केले. गटाच्या मेंटर सौ.मनीषा पाटील यांचे मौल्यवान व विशेष असे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.
सदर कार्यक्रमासाठी उप कृषी अधिकारी राजेंद्र पवार, सहाय्यक कृषी अधिकारी नागेश काळे उपस्थित होते. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्या सौ.नंदिनी डोंगरे, भावेश्वरी शेतकरी गटाच्या अध्यक्षा विजया वर्देकर, निमंत्रक विश्वास देसाई, निमंत्रक संजय डोंगरे, अर्चना डोंगरे, अण्णा डोंगरे, परशराम डोंगरे, गीता डोंगरे, दत्तात्रय खवरे , गणपती लांडे, ज्योती डोंगरे, पूनम कोंडुसकर आदी सदस्य आणि गावातील शेतकरी तानाजी डोंगरे , अशोक डोंगरे आदींनी वनराई बंधारा बांधण्यासाठी मदत केली.
गटातील महिलांनी गुच्छ तयार करून या कार्यक्रमासाठी उपस्थित अधिकारी यांचे स्वागत केले.भावेश्वरी शेतकरी गट, सुलगाव यांच्या या पर्यावरणपूरक व समाजोपयोगी उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
*दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी नदीवर वनराई बंधारा बांधकाम
|