बातम्या

महावितरणच्या अभियंत्यांचे योगदान राज्याच्या प्रगतीला गती देणारे : सीएमडी श्री. लोकेश चंद्र महावितरणकडून अभियंता दिन उत्साहात  

Contribution of Mahavitaran Engineers Accelerates


By nisha patil - 9/15/2026 9:05:31 PM
Share This News:



महावितरणच्या अभियंत्यांचे योगदान राज्याच्या प्रगतीला गती देणारे : सीएमडी श्री. लोकेश चंद्र
महावितरणकडून अभियंता दिन उत्साहात  

 

मुंबई, दि. १५ सप्टेंबर २०२६: ‘अभियांत्रिकी ही केवळ एक नोकरी किंवा व्यवसाय नसून तो देशाच्या प्रगतीचा आणि विकासाचा मुख्य कणा आहे. राज्यातील घरे, व्यवसाय, उद्योग, कृषी अशा ३ कोटींवर ग्राहकांकडे दररोज वीजपुरवठा पोहोचवण्यामागे अभियंत्यांचे कौशल्य व महत्वाचे योगदान आहे. वीजक्षेत्राच्या माध्यमातून महावितरणचे अभियंते राज्याच्या प्रगतीला गती देत आहेत’, अशा शब्दांत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी अभियंत्यांच्या योगदानाचा गौरव केला. 
 

भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (दि. १५) 'प्रकाशगड' मुख्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी पाठवलेल्या शुभेच्छा संदेशामध्ये अभियंत्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. 
 

ऊर्जा क्षेत्रात सध्या मोठे बदल होत असून हरित ऊर्जा, डिजिटलायझेशन आणि आधुनिक पायाभूत सुविधांवर भर दिला जात आहे. या बदलत्या काळात अभियंत्यांची भूमिका अधिक जबाबदारीची बनली आहे. त्यामुळे नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा. वीजग्राहकांच्या तत्पर सेवेला आणि कामात सुरक्षितता व तांत्रिक उत्कृष्टतेच्या दर्जेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन श्री. लोकेश चंद्र यांनी केले. 
 

यावेळी संचालक (संचालन) श्री. धनंजय औंढेकर म्हणाले की, ‘महावितरणच्या अभियंत्यांचे कार्यकौशल्य आणि अहोरात्र मेहनत यामुळे महावितरणसह राज्याची प्रगतीकडे वेगाने वाटचाल सुरु आहे. अभियंत्यांच्या याच प्रयत्नांमुळे भविष्यातील हरित क्रांती आणि शून्य प्रदूषणाचे उद्दिष्ट निश्चितपणे साध्य होईल’. 
संचालक (वाणिज्य) श्री. योगेश गडकरी यांनी महावितरण समोरील बदलत्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अभियंत्यांनी अधिक जोमाने काम करण्याची गरज व्यक्त केली. संचालक (प्रकल्प) श्री. सचिन तालेवार यांनी विविध आघाड्यांवर काम करताना ताण - तणावाचे योग्य व्यवस्थापन करून नोकरी व कुटुंब यांच्यात योग्य समतोल राखण्याचे आवाहन केले. संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार म्हणाले, महावितरणच्या यंदाच्या अभियंता दिनाचे वैशिष्ट्य म्हणजे महावितरणच्या अभियंत्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्युत सुरक्षा, हरित ऊर्जेचा अंगिकार आणि वीजबचतीचा जागर सुरू केला आहे. या मोहिमेच्या माध्यमातून आपले सगळे अभियंते कृतीतून अभियंता दिवस साजरा करून सामाजिक जबाबदारी देखील निभावत आहेत, असे ते म्हणाले. 
यावेळी कार्यकारी संचालक सर्वश्री परेश भागवत, भुजंग खंदारे, दिनेश अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला मुख्य अभियंते मनीष वाठ, अंकुर कावळे, ज्ञानेश कुलकर्णी, मंगेश कोहाट, अशोक साळुंखे, संतोष सांगळे, प्रशांत दानोलीकर, पंकज तगलपल्लेवार, सुचित्रा गुजर, कविता घरत यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी यांनी केले व आभार मानले.


महावितरणच्या अभियंत्यांचे योगदान राज्याच्या प्रगतीला गती देणारे : सीएमडी श्री. लोकेश चंद्र महावितरणकडून अभियंता दिन उत्साहात  
Total Views: 13