बातम्या
गणेश आगमन मिरवणुकीत वाद : तरुणाकडून बंदुकीचा धाक– पाचगाव हादरले
By nisha patil - 8/26/2025 3:15:10 PM
Share This News:
गणेश आगमन मिरवणुकीत वाद : तरुणाकडून बंदुकीचा धाक– पाचगाव हादरले
कोल्हापूरजवळील पाचगाव येथे सोमवारी रात्री गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान भीषण वाद निर्माण झाला. गाणी लावण्याच्या वादातून वर्चस्वाचा झगडा उफाळून आला आणि यातून एका तरुणाने कारमधून बंदूक बाहेर काढत महिलांना व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला.
या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गणपती आगमनाच्या उत्साही वातावरणात असे प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका मंडळाच्या आगमन मिरवणुकीदरम्यान गाणी लावण्यावरून वाद झाला. याच वादातून संबंधित तरुणाने आपल्या कारमध्ये ठेवलेली बंदूक काढून थेट कार्यकर्त्यांवर रोखली. त्यावेळी महिलांना देखील धमकावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी त्वरीत चौकशी सुरू केली असून संबंधित तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तरीदेखील या घटनेमुळे पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
उद्या बुधवारी बाप्पांचे आगमन होणार असताना, अशा प्रकारच्या घटनांमुळे उत्सवी वातावरणावर सावट निर्माण झाले आहे.
गणेश आगमन मिरवणुकीत वाद : तरुणाकडून बंदुकीचा धाक– पाचगाव हादरले
|