ताज्या बातम्या

'स्पर्श' कुष्ठरोग जनजागृती अभियानात सहकार्य करा - जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे जिल्हावासीयांना आवाहन

Cooperate in the Sparsh leprosy awareness campaign  District Collector Amol Yedge appeals to the district residents


By nisha patil - 1/19/2026 3:10:46 PM
Share This News:



कोल्हापूर:- कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास ती लपवू नका, तर जवळच्या शासकीय दवाखान्यात जाऊन तपासणी करून घ्यावी. "भेदभाव समाप्त करूया, सन्मानाची वागणूक देऊया" हे या वर्षीचे ब्रीदवाक्य असून नागरिकांनी या मोहिमेत सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रशांत वाडीकर, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. हेमलता पालेकर यांनी केले आहे.

कोल्हापूर जिल्हा कुष्ठरोगमुक्त करण्याच्या उद्देशाने 'राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत' जिल्ह्यात 'स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान २०२६' राबविण्यात येणार आहे. ३० जानेवारी (महात्मा गांधी पुण्यतिथी) या 'कुष्ठरोग निवारण दिना'पासून या अभियानाची सुरुवात होणार असून, १३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत हे पंधरवाडा अभियान सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील या मोहिमेच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची सभा पार पडली. यावेळी जिल्हा परिषद, आरोग्य तसेच आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील अतिजोखमीच्या ५८७ ठिकाणांवरील ३५ हजार लोकसंख्येचे १०० टक्के सर्वेक्षण पुर्ण करण्याचे निर्देश दिले. त्याठिकाणी स्थलांतरीत होणारी लोकसंख्या विचारात घेऊन गावांमध्ये अगोदरच आवश्यक संदेश द्या असेही सांगितले. 

विशेष ग्रामसभा आणि शपथ
येत्या २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित विशेष ग्रामसभांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या "कुष्ठरुग्णांशी भेदभाव समाप्त करूया, सन्मानाची वागणूक देऊया" या आवाहनाचे वाचन केले जाणार आहे. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील कुष्ठरोगमुक्त भारतासाठी सरपंच आणि ग्रामस्थांना प्रतिज्ञा दिली जाणार आहे.

शाळांमध्ये जनजागृती आणि 'सपना'चा संदेश
अभियान कालावधीत जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये प्रार्थनेनंतर कुष्ठरोग निवारणाची प्रतिज्ञा घेतली जाईल. कुष्ठरोग जनजागृतीसाठी तयार केलेल्या 'सपना' या आयडॉलमार्फत समाजाला दिला जाणारा संदेश वाचून दाखवला जाणार आहे. यातून कुष्ठरोगाची शास्त्रीय माहिती, लवकर निदान आणि उपचारांचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाईल.

कुष्ठरोगाची लक्षणे व उपचार
कुष्ठरोग हा त्वचेचा आणि मज्जासंस्थेचा आजार असून तो पूर्णपणे बरा होतो. खालील लक्षणे आढळल्यास तत्काळ तपासणी करावी:
* त्वचेवर फिक्कट किंवा लालसर रंगाचा चट्टा असणे ज्यावर संवेदना (स्पर्श) जाणवत नाही.
* चट्ट्यावरील केस गळणे किंवा त्या ठिकाणी घाम न येणे.
* हाता-पायांना मुंग्या येणे, शक्ती कमी होणे किंवा बरी न होणारी जखम असणे.
या आजाराचे निदान आणि बहुविध औषधोपचार (MDT) सर्व शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि मनपा दवाखान्यांमध्ये मोफत उपलब्ध आहेत.

'कुसुम' मोहिमेद्वारे वंचित घटकांवर लक्ष
३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी या काळात 'कुसुम' (कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र) ही मोहीमही राबविली जाणार आहे. यात वीटभट्ट्यांवरील कामगार, स्थलांतरित मजूर, बांधकाम मजूर, निवासी शाळा, खाणकामगार आणि कारागृहातील कैदी यांची 'आशा' स्वयंसेविका व पुरुष आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत विशेष तपासणी केली जाईल.

जिल्ह्याची सांख्यिकी स्थिती
कोल्हापूर जिल्ह्यात एप्रिल २०२५ ते डिसेंबर २०२५ अखेर एकूण १७३ नवीन कुष्ठरुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. संसर्ग रोखण्यासाठी रुग्णाच्या संपर्कातील नातेवाईकांना 'रिफॅम्पिसीन' या औषधाचा एक डोस देऊन सुरक्षित करण्यात आले आहे. 

 


'स्पर्श' कुष्ठरोग जनजागृती अभियानात सहकार्य करा - जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे जिल्हावासीयांना आवाहन
Total Views: 40