बातम्या

महिला दिनानिमित्त नगरसेविकांची क्रिकेट स्पर्धा; महापौर संघ विजेता

Cricket competition for corporators on Womens Day


By Administrator - 10/3/2026 1:29:01 PM
Share This News:



महिला दिनानिमित्त नगरसेविकांची क्रिकेट स्पर्धा; महापौर संघ विजेता

कोल्हापूर, ता. ९ : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने महापालिकेच्या वतीने शास्त्रीनगर मैदानावर नगरसेविकांची मैत्रीपूर्ण क्रिकेट स्पर्धा रंगली. विविध पक्षांतील नगरसेविकांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवत उत्साहाने सहभाग घेत मैदानावर चौकार-षटकारांची आतषबाजी केली.
 

महापौर रूपाराणी निकम यांच्या रेड संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले, तर शिक्षिकांच्या ‘कोल्हापूर वॉरिअर्स’ संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ब्ल्यू संघ तिसऱ्या स्थानावर राहिला. स्पर्धेत ३२ धावांची तडाखेबंद खेळी करणाऱ्या महापौर निकम यांना ‘मालिकावीर’चा मान मिळाला. नेहा तेंडुलकर (२५), निलांबरी साळोखे (१६), गीता काळे (१७) आणि स्वाती चौगुले (१३) यांनीही उल्लेखनीय फलंदाजी केली.
 

उपायुक्त किरणकुमार धनवाडे, काकासाहेब पाटील व क्रीडा निरीक्षक सचिन पांडव यांच्या पुढाकाराने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी सभागृह नेते मुरलीधर जाधव, बबन मोकाशी, प्रतिज्ञा उत्तुरे, जयश्री चव्हाण व उज्ज्वला शिंदे उपस्थित होते. या स्पर्धेतून खेळाच्या माध्यमातून एकोपा व उत्साहाचा संदेश देण्यात आला.


महिला दिनानिमित्त नगरसेविकांची क्रिकेट स्पर्धा; महापौर संघ विजेता
Total Views: 8