बातम्या
चेष्टा मस्करीतून वाद - वादातून चाकू हल्ला - एकाचा मृत्यू तर दोनजण जखमी*
By nisha patil - 2/4/2026 12:07:26 PM
Share This News:
**चेष्टा मस्करीतून वाद - वादातून चाकू हल्ला - एकाचा मृत्यू तर दोनजण जखमी*
**आजऱ्यातील नाईक गल्लीतील घटना*
**आजरा (हसन तकीलदार)* आजरा शहरातील नाईक गल्लीत मित्रांमध्ये बोलत बोलत झालेली चेष्टा मस्करी, त्यानंतर सुरू झालेला चर्चेतून वाद होऊन अखेर हा वाद विकोपाला जाऊन वादातून चाकू हल्ला झाल्याने यामध्ये कैफ साजिद खतिब (वय २३ रा. वाडा गल्ली, आजरा) या युवकाचा मृत्यू झाला असून समी अब्दुल गफार तकिलदार (वय २६ रा. दर्गा गल्ली, आजरा) व आतिफ इस्माईल हिंग्लजकर (वय १९ रा. पटेल कॉलनी आजरा) हे गंभीर जखमी झाले असल्याचे समजते याप्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित म्हणून अरकाम महम्मद लमतुरे, अबुसुफियान महम्मद लमतुरे, शकील हसनअली खेडेकर (सर्व रा. नाईक गल्ली, आजरा) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक मिळालेली माहिती अशी की,बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नाईक गल्ली येथील मरकज मस्जिद समोर हे सर्वजण एकत्र आले. सुरुवातीला वेगवेगळ्या विषयावरून त्यांच्यात थट्टा मस्करी सुरू झाली. कालांतराने त्यांच्यात वाद सुरू झाला व वादाचे पडसाद मारामारीत झाले. याचवेळी अरकाम लमतुरे याने आपल्याजवळील चाकू काढून त्याने मृत कैफसह समी तकिलदार व आतिफ हिंग्लजकर यांच्यावर वार करण्यास सुरुवात केली. तर अबुसुफियान व शकील यांनी तिघांना लाथाबुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केली.
यामध्ये कैफ खतीफच्या छातीवर चाकूचा वर्मी वार झाल्याने हा गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याला तातडीने गडहिंग्लज येथे उपचारासाठी हलवत असताना वाटेतच त्याचे निधन झाले. तर समी तकिलदार व अतिफ हिंग्लजकर यांच्यावर सद्या उपचार सुरू आहेत.
मयत कैफ खतीबच्या नातेवाईकांनी व मित्रपरिवाराने संशयित अरकाम याच्या घरावर दगडफेक केली तसेच त्याच्या दुचाकीची मोडतोड केली असल्याचे समजते. वातावरण तंग झाल्याने तीन पोलीस अधिकाऱ्यांसह २५ जादा पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनाने वेळीच नियंत्रण आणण्यात यश आणले.मरकज मस्जिद परिसरासह संपूर्ण नाईक गल्लीला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. घटनास्थळी गडहिंग्लजचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, जिल्हा रात्रगस्त विभाग, इचलकरंजीचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, भुदरगडचे पोलीस निरीक्षक , आजरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले सर्व अधिकारी यांनी परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले. रात्री उशिरापर्यंत ते घटनेची माहिती घेत होते. या घटनेबाबतचा घटनास्थळावर पंचनामा करून अधिक तपास ठाणे अंमलदार रमेश गवळी करीत आहेत.
चेष्टा मस्करीतून वाद - वादातून चाकू हल्ला - एकाचा मृत्यू तर दोनजण जखमी*
|