आरोग्य
बनावट औषधांवर आळा! राज्यात जागेवरच तपासणी करणारी अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित होणार
By nisha patil - 12/20/2025 1:05:41 PM
Share This News:
कोल्हापूर:- राज्यातील रुग्णालये व मेडिकल स्टोअर्समध्ये वाढत चाललेल्या बनावट व भेसळयुक्त औषधांच्या तक्रारींना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. औषधांची गुणवत्ता जागेवरच तपासता यावी यासाठी सरकारकडून ‘काउंटरफिट ड्रग डिटेक्शन डिव्हाइस’ ही अत्याधुनिक उपकरणे खरेदी करण्यात येणार आहेत.
राज्य सरकार प्रत्येकी १.१९ कोटी रुपये किमतीची एकूण ८ उपकरणे खरेदी करणार असून ती अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) राज्यातील आठ विभागीय कार्यालयांना देण्यात येणार आहेत. त्यामुळे औषधांची तपासणी थेट जिल्हा व विभागीय स्तरावरच करता येणार आहे.
काही मिनिटांत मिळणार प्राथमिक निकाल
या उपकरणांच्या सहाय्याने औषधांमधील घटक, त्यांची शुद्धता व मानकांशी सुसंगतता काही मिनिटांत तपासता येणार आहे. भेसळ किंवा बोगसपणा आढळल्यास संबंधित मेडिकल, वितरक किंवा औषध उत्पादकावर तात्काळ कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
शासकीय रुग्णालयांतही संशयित औषधे
आतापर्यंत बनावट औषधांचा प्रश्न खासगी रुग्णालये व मेडिकल स्टोअर्सपुरताच मर्यादित असल्याचे मानले जात होते. मात्र, अलीकडील तपासणीत काही शासकीय रुग्णालयांमध्येही निकृष्ट व संशयित औषधे आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
प्रयोगशाळा तपासणीचा विलंब टळणार
यापूर्वी औषधांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवल्यानंतर अहवाल मिळण्यासाठी १५ ते ३० दिवसांचा कालावधी लागत होता. या कालावधीत संबंधित औषधे बाजारात विक्रीस राहण्याचा धोका होता. नव्या यंत्रणेमुळे हा विलंब टळणार आहे.
परवाने रद्द व निलंबित
गेल्या वर्षभरात कोल्हापूर जिल्ह्यासह विविध भागांत तपासणीत अनेक औषधे दर्जाहीन व बनावट आढळली आहेत. त्यानुसार काही मेडिकल स्टोअर्सचे परवाने रद्द तर काहींचे निलंबित करण्यात आले आहेत.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे बनावट औषधांवर मोठ्या प्रमाणात आळा बसणार असून, रुग्णांच्या सुरक्षिततेला अधिक बळ मिळणार आहे.
बनावट औषधांवर आळा! राज्यात जागेवरच तपासणी करणारी अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित होणार
|