शैक्षणिक

डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांची  'ईथॉस फेलोशिप' मध्ये उल्लेखनीय कामगिरी

D Y Patil Architecture students achieve remarkable


By nisha patil - 7/29/2025 9:18:27 PM
Share This News:



डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांची  'ईथॉस फेलोशिप' मध्ये उल्लेखनीय कामगिरी

कोल्हापूर – डी. वाय. पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, कोल्हापूरच्या  स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी ईथॉस फाउंडेशनच्या श्रम उपक्रमातर्गत राबवण्यात आलेली “डिग्निटी आणि इन्क्लुजन फेलोशिप” यशस्वीरित्या पूर्ण करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.  एकूण ६५ हजार रुपये अनुदानाच्या या फेलोशिपमध्ये विद्यार्थ्यांना बांधकाम प्रक्रियेतील मानवी योगदान समजून घेण्याची संधी मिळाली.

इन्क्लुजन फेलोशिपअंतर्गत प्रा. गौरी म्हेतर यांच्या मार्गदर्शनाखाली अभिषेक म्हेत्रे,  देवयानी देसाई, श्रद्धा जंगम, श्राव्या रेवनकर, तन्वी पाटील, गार्गी पवार, वैष्णवी गोसावी, पृथ्वीराज राजूरकर, आर्यन काळे ९ विद्यार्थ्यांच्या समूहाने टाईल लावणे, ब्रिकवर्क, प्लास्टरिंग आदी पारंपरिक कौशल्यांमध्ये निपुण ५० बांधकाम मजुरांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखतींमधून त्यांच्या पारंपारिक कौशल्यांचा गौरव करत, मजुरांना भेडसावणाऱ्या समस्या, अनुभव व परंपरा यांचे दस्तऐवजीकरण करण्यात आले. त्यांचे कौशल्य जपणे व संवर्धन करणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट होते.

प्रा. गीता वागळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिशा बुबनाळे, आर्यन पाटील, श्रीधन वडिंगे, मनीष भाटी, मृगजा पाटील, पियुष पाटील, पायल कोळी, श्वेताली देशमुख, प्रांजल मेघानी यानी डिग्निटी फेलोशिपअंतर्गत ६० हून अधिक साइट क्लिप्सचा वापर करून बांधकाम प्रक्रियेतील प्रारंभ ते शेवटच्या टप्प्यापर्यंतचे दोन सविस्तर व्हिडिओ डॉक्युमेंटेशन तयार केले. यामुळे विद्यार्थ्यांना बांधकाम प्रक्रियेचे सखोल ज्ञान मिळाले आणि कामाविषयीची संवेदनशीलता वृद्धिंगत झाली.

पाच महिन्यांची सखोल फेलोशिप पूर्ण केल्याबद्दल डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे आणि प्राध्यापकांचे अभिनंदन केले. डॉ. गुप्ता म्हणाले, "अशा प्रकारच्या फेलोशिपमुळे विद्यार्थ्यांना बांधकामाच्या प्रत्यक्ष परिस्थितीची जाणीव होते. त्याचबरोबर श्रमिकांच्या अडचणी समजून घेण्याची संधी मिळते. या अनुभवाच्या आधारे कोल्हापूरमधील तांत्रिक संस्थांच्या समन्वयातून कोणते उपक्रम राबवता येतील, यावर एकत्र येऊन उपाययोजना आखण्याची गरज आहे. 

या यशस्वी उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे व आर्किटेक्चर विभागप्रमुख आर्किटेक्ट आय. एस. जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
 


डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांची  'ईथॉस फेलोशिप' मध्ये उल्लेखनीय कामगिरी
Total Views: 50