शैक्षणिक

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा  ‘ब्रह्माकुमारी’ सोबत सामंजस्य करार

D Y Patil University signs MoU with Brahma Kumaris


By nisha patil - 7/15/2025 8:56:05 PM
Share This News:



डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा  ‘ब्रह्माकुमारी’ सोबत सामंजस्य करार

कोल्हापूर  डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय माउंट अबू, राजस्थान यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचारसरणी आणि मूल्याधारित जीवनशैली यांचे संवर्धन करणे हा कराराचा मुख्य उद्देश असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी हा करार फायदेशीर ठरणार आहे. 

विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राकेश कुमार शर्मा आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले तर ब्रह्माकुमारी संस्थेच्या राजयोग एज्युकेशन अँड रिसर्च फौंडेशन, वैद्यकीय विभागाचे सहसचिव डॉ. सचिन परब आणि ब्रह्माकुमारी कोल्हापूर केंद्र प्रमुख ब्रम्हाकुमारी सुनंदा यांच्या स्वाक्षरीने हा करार करण्यात आला. यावेळी विद्यापीठाच्या आयक्यूएसी संचालक डॉ. शिंपा शर्मा, उपअधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, वैदयकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे, प्र. प्राचार्य रुधीर बारदेस्कर, डॉ. आर. एस. पाटील  आणि ब्रम्हाकुमारी रश्मी आदी उपस्थित होते.

या कराराअंतर्गत ब्रम्हाकुमारी संस्थेच्या सहकार्याने विद्यापीठात आरोग्यसेवेतील व्यावसायिकांसाठी मूल्याधिष्ठित आध्यात्मिक दृष्टिकोनावर आधारित ‘विहासा’ प्रशिक्षण, तंत्रज्ञानाच्या वापरात संतुलन साधणाऱ्या अभ्यासक्रमाद्वारे मानसिक आरोग्य व जीवनशैली सुधारण्यासाठी डिजिटल वेलनेस कोर्स, व्यसनमुक्तीसाठी सशक्त मानसिक बळ देणारा डी-अ‍ॅडिक्शन प्रोग्रॅम, आंतरराष्ट्रीय योग दिन व तत्सम कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी नियमित ध्यान व योगसाधनेसाठी राजयोग, ध्यानकक्ष व डिजिटल लायब्ररीतील मानसिक विश्रांतीसाठी 'माइंड स्पा', मूल्याधारित शिक्षण व व्यक्तिमत्व विकासासाठी मूल्यशिक्षण विभाग आदी उपक्रम राबवले जाणार आहेत. 

विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी हे अभ्यासक्रम प्रमाणपत्र, मूल्यवर्धक अभ्यासक्रम म्हणून उपलब्ध असतील. हे अभ्यासक्रम ब्रह्माकुमारी संस्था मान्यताप्राप्त प्रशिक्षकांमार्फत राबवले जातील आणि ते पूर्ण करणाऱ्या वियार्थ्याना दोन्ही संस्थांच्या संयुक्त प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. 

या कराराची कालमर्यादा पाच वर्षांची असून, दोन्ही संस्थांच्या परस्पर संमतीने पुढे वाढवता येणार आहे. अभ्यासक्रमांचे नियोजन, शुल्क, परीक्षा व प्रमाणपत्र वाटप आदी जबाबदाऱ्या विद्यापीठ पार पाडेल, तर अभ्यासक्रमाचे साहित्य व प्रशिक्षक व्यवस्था ब्रह्माकुमारी संस्था करेल.

कुलगुरु डॉ. राकेश कुमार शर्मा म्हणाले, विद्यापीठाच्या दृष्टीने हा करार एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.विद्यापीठाकडून गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असतानाच मूल्य, आचारसंहिता व अंतर्मनाचा विकास यालाही तेवढेच महत्त्व देण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल. 

डॉ. सचिन परब म्हणाले, तणावमुक्त जीवनशैलीमध्ये सकारात्मक विचारसरणी ही विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे. डी. वाय. पाटील विद्यापीठासोबतचा हा करार समाजोपयोगी शिक्षणाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.

कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा करार करण्यात आला.


डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा  ‘ब्रह्माकुमारी’ सोबत सामंजस्य करार
Total Views: 51