शैक्षणिक

४०० महाविद्यालयांमध्ये डी वाय पाटीलचा दबदबा ‘आर्किटेक्ट लुईस आय कान ट्रॉफी’वर नाव कोरले

DY Patil Shines Among 400 Colleges Secures Coveted Louis I Kahn Trophy


By nisha patil - 6/23/2026 6:16:04 PM
Share This News:



कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरने राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठेची आर्किटेक्ट लुईस आय. कान (LIK) ट्रॉफी जिंकून मानाचा तुरा रोवला आहे. कागल येथील ऐतिहासिक वारसा असलेल्या ‘माळ बंगला’ (शाहू शुगर फॅक्टरी कार्यालय) या वास्तूच्या दस्तऐवजीकरणासाठी महाविद्यालयाला हा बहुमान मिळाला.

हैदराबाद येथे ११ ते १४ जून २०२६ दरम्यान आयोजित नॅशनल असोसिएशन ऑफ स्टुडंट्स ऑफ आर्किटेक्चर (NASA India) च्या ६८ व्या राष्ट्रीय अधिवेशनात देशभरातील सुमारे ४०० वास्तुकला महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. वारसा वास्तूंच्या दस्तऐवजीकरणासाठी दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या एलआयके ट्रॉफीसाठी ९० संघांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली.

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या २७ विद्यार्थ्यांनी ‘माळ बंगला’ या ऐतिहासिक वास्तूचे सखोल दस्तऐवजीकरण केले. देशभरातील प्रवेशिकांमधून या प्रकल्पाची अंतिम दहा उत्कृष्ट प्रकल्पांमध्ये निवड झाली होती. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ परीक्षक मंडळाने अंतिम मूल्यमापनानंतर या प्रकल्पाला विजेतेपद बहाल केले.

या यशामागे प्रा. शैलेश कडोलकर, प्रा. धनश्री पवार आणि प्रा. तनया वणकुद्रे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच अधिवेशनात महाविद्यालयाचा तृतीय वर्षाचा विद्यार्थी सूरज हुरकडली याला उत्कृष्ट कार्यासाठी सुवर्णपदक प्रदान करण्यात आले, तर अथर्व कुंभोजकर याचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी विद्यार्थी आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन करत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


कागलच्या ‘माळ बंगल्या’च्या दस्तऐवजीकरणाला राष्ट्रीय गौरव; डी. वाय. पाटील आर्किटेक्चर विभाग अव्वल
Total Views: 20