बातम्या
काझीरंगात काळाचा घाला! भरधाव मिनी बस कंटेनरवर आदळली; २६ जणांचा दुर्दैवी मृत्यू!
By nisha patil - 11/14/2026 3:11:06 PM
Share This News:
काझीरंगात काळाचा घाला! भरधाव मिनी बस कंटेनरवर आदळली; २६ जणांचा दुर्दैवी मृत्यू!
आसामच्या काझीरंगामध्ये भीषण रस्ते अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. भरधाव वेगाने जाणारी मिनी बस समोरून येणाऱ्या कंटेनर ट्रकला धडकली आणि या भीषण अपघातात तब्बल २६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. या अपघाताचा थरार कंटेनरमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये समोरून वेगाने येणारी मिनी बस अचानक नियंत्रणाबाहेर जात कंटेनरच्या मार्गात घुसताना दिसते. त्यानंतर दोन्ही वाहनांची जोरदार धडक होते. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की मिनी बसचा अक्षरशः चक्काचूर झाला.
शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास बोखाघाटहून नगावच्या दिशेने ही बस जात होती. बसमध्ये बहुतांश विद्यार्थी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर बचाव पथकाने बस कापून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या मिनी बसवर यापूर्वी वेगमर्यादा उल्लंघनाचे १२ चलन असल्याची माहितीही समोर आली आहे. यातील ३८ हजार ५०० रुपयांचा दंड भरला होता, तर ४ हजार रुपयांचा दंड प्रलंबित होता. या घटनेनंतर आसाम सरकारकडून सखोल चौकशीचे आदेश देण्याची मागणी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.
काझीरंगात काळाचा घाला! भरधाव मिनी बस कंटेनरवर आदळली; २६ जणांचा दुर्दैवी मृत्यू!
|