ताज्या बातम्या
नृसिंहवाडीत आजपासून दत्तजयंती महोत्सवाचा शुभारंभ;
By nisha patil - 11/27/2025 4:44:36 PM
Share This News:
नृसिंहवाडीमध्ये गुरुवारपासून दत्तजयंती महोत्सवाला सुरुवात होत आहे. कृष्णा–पंचगंगा तीर भक्तिरसात रंगला असून सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. यंदा उत्सवाचा मान विनोद पुजारी (राजोपाध्ये) व बंधूंकडे असून दत्त देवस्थानच्या सहकार्याने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन झाले आहे.
मुख्य जन्मकाळ सोहळा ४ डिसेंबर रोजी सायं. ५ वाजता होणार असून सुमारे ५ ते ६ लाख भाविकांच्या उपस्थितीची अपेक्षा आहे. उत्सवकाळात काकडआरती, अभिषेक, महापूजा, पालखी, तसेच रोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
कोल्हापूर, मुंबई, पुणे, सांगली येथील नामांकित गायकांसह विविध भजनी मंडळांची सेवा भाविकांना लाभणार आहे. दररोज रात्री ९:३० वाजता ह.भ.प. संकेतबुवा काणे यांचे कीर्तन होईल. तसेच ४ डिसेंबर रोजी ‘गुरुनामाची ओढ’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम रंगणार आहे.
जन्मकाळानंतर ‘श्रीं’चा पाळणा पुजारी राजोपाध्ये यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. उत्सवाचे मानकरी विनोद पुजारी यांनी यंदाचा सोहळा भव्यदिव्य स्वरूपात पार पडणार असल्याची माहिती दिली.
नृसिंहवाडीत आजपासून दत्तजयंती महोत्सवाचा शुभारंभ;
|