कोल्हापुरात दत्तात्रय सावंत यांच्या प्रचाराचा झंझावात!

Dattatry sawant


By nisha patil - 10/13/2026 10:24:57 AM
Share This News:



कोल्हापुरात दत्तात्रय सावंत यांच्या प्रचाराचा झंझावात!

शेकडो शाळांपर्यंत प्रचार मोहीम; शिक्षकांनीच घेतली प्रचाराची धुरा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या समर्थनार्थ कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार प्रचार मोहीम सुरू आहे. विशेष म्हणजे, शिक्षक बांधवांनीच प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतल्याने सावंत यांच्या प्रचाराला वेग आला आहे.

येत्या २३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भुदरगड, शाहूवाडी, हातकणंगले, पन्हाळा, करवीर, कागल, आजरा, शिरोळ, गडहिंग्लज आणि चंदगड या तालुक्यांतील शेकडो शाळांना शिक्षक व कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या. यावेळी दत्तात्रय सावंत यांना प्रथम पसंतीचे मतदान करून विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.

 

२०१४ ते २०२० या काळात शिक्षक मतदारसंघाचे नेतृत्व केलेल्या सावंत यांच्या पाठीशी शिक्षक चळवळीचे जाळे आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी उभी असल्याचे या प्रचारातून दिसून येत आहे. बलाढ्य राजकीय पक्षांचे पाठबळ नसतानाही शिक्षकांच्या प्रत्यक्ष सहभागातून प्रचाराची प्रभावी यंत्रणा उभी करण्यात आली आहे.

 

शिक्षकांचा थेट संपर्क, कार्यकर्त्यांची धडपड आणि सर्वदूर सुरू असलेला प्रचार यामुळे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दत्तात्रय सावंत यांच्या उमेदवारीची चर्चा रंगू लागली आहे. मतदानाच्या दिवसापर्यंत ही प्रचाराची गती किती प्रभावी ठरते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


कोल्हापुरात दत्तात्रय सावंत यांच्या प्रचाराचा झंझावात!
Total Views: 14