विशेष बातम्या
दावोस दौरा शंभर टक्के यशस्वी; ३७ लाख कोटींचे करार, ४३ लाख रोजगारनिर्मिती – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत
By nisha patil - 1/24/2026 11:39:15 AM
Share This News:
दावोस दौरा शंभर टक्के यशस्वी; ३७ लाख कोटींचे करार, ४३ लाख रोजगारनिर्मिती
– उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत
स्वित्झर्लंडमधील दावोस येथे पार पडलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्रासाठी आतापर्यंत एकूण ३७ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार (MoU) करण्यात आले असून, त्यातून राज्यात ४३ लाख युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे दावोस दौरा शंभर टक्के यशस्वी ठरला असल्याची माहिती उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
८१ सामंजस्य करार; ८० टक्के थेट परकीय गुंतवणूक
उद्योगमंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले की, दावोस दौऱ्यात एकूण ८१ सामंजस्य करार झाले असून, त्यापैकी ५१ करार उद्योग क्षेत्रातील असून त्यांची गुंतवणूक १६.६९ लाख कोटी रुपये आहे.
‘एमएमआरडीए’ अंतर्गत २४ करार असून त्यांची किंमत १९.४३ लाख कोटी रुपये आहे, तर सिडको अंतर्गत ६ करार असून त्यांची गुंतवणूक १.१५ लाख कोटी रुपये आहे. एकूण गुंतवणुकीपैकी सरासरी ८० टक्के थेट परकीय गुंतवणूक (FDI) महाराष्ट्रात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मागील वर्षीचे करार प्रत्यक्षात; अनेक जिल्ह्यांत उद्योग उभारणी
मागील वर्षी दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये झालेल्या १५ लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे सांगून, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, रायगड आदी जिल्ह्यांत प्रत्यक्ष उद्योग उभे राहत असल्याचे डॉ. सामंत यांनी सांगितले.
रायगड–पेण ग्रोथ सेंटरसाठी एक लाख कोटींचे प्रयत्न
दावोस दौऱ्यात ऑटोमोबाईल, रिअल इस्टेट, डिफेन्स, फार्मा यांसह सर्व क्षेत्रांतील गुंतवणूक महाराष्ट्रात येणार असून, तिसऱ्या मुंबईतील रायगड–पेण ग्रोथ सेंटरसाठी एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
याशिवाय,
-
एमएमआर क्षेत्रात : २३ लाख कोटी
-
मल्टीपल लोकेशन्स : ७.७२ लाख कोटी
-
कोकण : ३.१० लाख कोटी
-
नागपूर : १.९५ लाख कोटी
-
नाशिक : ३०,१०० कोटी
-
छत्रपती संभाजीनगर : १७,७०० कोटी
-
पुणे : ३,२५० कोटी
-
अमरावती : १,००० कोटी
इतकी गुंतवणूक प्रस्तावित असल्याचेही त्यांनी सांगितले.
परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल
परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अव्वल असल्याचे सांगताना डॉ. सामंत म्हणाले की, केंद्र शासनाच्या सर्वेक्षणानुसार मागील वर्षी महाराष्ट्रात १.६४ लाख कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे. उद्योग उभारणीसाठी किमान चार ते पाच वर्षांचा कालावधी लागतो, हे लक्षात घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दावोस दौऱ्याचा खर्च व बल्क ड्रग पार्कबाबत स्पष्टीकरण
दावोस दौऱ्यावर झालेल्या खर्चाबाबत लवकरच सविस्तर माहिती जनतेसमोर मांडली जाईल, असे सांगून, बल्क ड्रग पार्क प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेलेला नसून रायगडमध्येच उभारला जात आहे, असेही उद्योगमंत्री डॉ. सामंत यांनी स्पष्ट केले.
उद्योग विभागावर होणारी तथ्यहीन टीका थेट उद्योजकांपर्यंत पोहोचत असल्याने राज्यात नकारात्मक वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी सर्वांनी जबाबदारीने भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
दावोस दौरा शंभर टक्के यशस्वी; ३७ लाख कोटींचे करार, ४३ लाख रोजगारनिर्मिती – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत
|