बातम्या
जानेवारी अखेरची डेडलाईन! मंत्री हसन मुश्रीफ यांचे रस्त्यांच्या कामांसाठी आदेश
By nisha patil - 11/23/2026 11:03:14 PM
Share This News:
जानेवारी अखेरची डेडलाईन! मंत्री हसन मुश्रीफ यांचे रस्त्यांच्या कामांसाठी आदेश
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि हॅम योजनेअंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेली रस्त्यांची कामे जानेवारी अखेरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करा, असे कडक निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. कागल, गडहिंग्लज आणि उत्तूर परिसरातील रस्ते तसेच विविध स्थानिक प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आढावा बैठका घेण्यात आल्या. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांकडून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला.
कागल, गडहिंग्लज आणि उत्तूर येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कामांसह कागल तालुक्यातील हॅम योजनेची कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. याशिवाय कागल येथील रि.स. क्रमांक ४२६ मधील रहिवाशांच्या प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न मानवी दृष्टिकोनातून सोडवण्याची सूचना त्यांनी केली. ४२ गुंठे जमीनधारकांना वगळून उर्वरित जमिनीचा स्वतंत्र सातबारा उतारा करण्याबाबतही चर्चा झाली.
तसेच सिद्धनेर्ली येथील वाढीव गावठाण आणि गायरान लाभार्थ्यांचे प्रस्ताव, २०११ पूर्वीच्या अतिक्रमणांचे नियमितीकरण आणि गडहिंग्लज येथील एम. आर. हायस्कूलच्या नवीन क्रीडांगणाची जागा जिल्हा परिषदेच्या नावावर करण्याबाबतही आढावा घेण्यात आला. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्यासह महसूल व संबंधित विभागांचे अधिकारी, कंत्राटदार आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते.
जानेवारी अखेरची डेडलाईन! मंत्री हसन मुश्रीफ यांचे रस्त्यांच्या कामांसाठी आदेश
|