बातम्या
दहावीच्या मुलाचा मृत्यू; “स्कूलवालोंने इतना बोला की…” – सुसाईड नोट वाचून सर्वजण हादरले
By nisha patil - 11/22/2025 1:35:23 PM
Share This News:
सांगली जिल्ह्यातील शौर्य प्रदीप पाटील या दहावीतील विद्यार्थ्याने दिल्लीतील मेट्रो स्टेशनवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून त्याच्या सुसाईड नोटमध्ये शिक्षकांकडून होत असलेल्या मानसिक छळाचा स्पष्ट उल्लेख आढळला आहे.
शौर्य (१६) हा दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत इयत्ता दहावीचा विद्यार्थी होता. त्याचे वडील प्रदीप पाटील हे सोने-चांदी गळाई व्यवसायामुळे अनेक वर्षे नवी दिल्लीतील राजीव नगर येथे स्थायिक आहेत. मंगळवारी १८ नोव्हेंबर रोजी राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून त्याने खाली उडी मारली.
गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शौर्यच्या स्कूल बॅगमधून पोलिसांना दीड पानांची सुसाईड नोट मिळाली असून त्यात “आय अॅम व्हेरी सॉरी… पर स्कूलवालोंने इतना बोला की मुझे यह करना पडा… मेरे पॅरेंटसने बहुत कुछ किया, मैं उनको कुछ नहीं दे पाया… सॉरी मम्मी…” असे भावनिक शब्द लिहिल्याचे समोर आले.
या नोटच्या आधारावर राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी शाळेच्या प्राचार्या अपराजिता पाल यांच्यासह चार शिक्षिकांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मूळचे सांगलीतील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर येथील रहिवासी असलेल्या शौर्यच्या मृत्यूने संपूर्ण सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली असून आज ढवळेश्वर येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दहावीच्या मुलाचा मृत्यू; “स्कूलवालोंने इतना बोला की…” – सुसाईड नोट वाचून सर्वजण हादरले
|