शैक्षणिक
आजरा येथे झालेल्या शाळा बचाव आंदोलनाच्या मेळाव्यात कोल्हापूरला शिक्षण हक्क लढा परिषद घेण्याचा निर्णय
By Administrator - 11/1/2026 2:23:21 PM
Share This News:
आजरा(हसन तकीलदार):-
बहुजन समाजाला शिक्षणातून कायमचे हद्दपार करण्यासाठी खेड्यापाड्यातील वाड्यावस्तीवरील मराठी शाळा बंद करण्याचा सरकारचा डाव असून याविरोधात तीव्र लढा करण्याचा निर्णय आज आजरा येथे झालेल्या मेळाव्यात करण्यात आला. या लढ्याची सुरवात देशात सर्वात प्रथम मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीत कोल्हापूर येथे शिक्षण हक्क लढा परिषद घेऊन करण्यात येणार आहे असे आजऱ्यात झालेल्या शाळा बचाव आंदोलन मेळाव्यात घेण्यात आला.
यावेळी शाळा बचाव आंदोलनाचे निमंत्रक कॉ. संपत देसाई म्हणाले की, कमी पटसंख्येचे कारण पुढे करीत संचमान्यतेच्या नावाखाली सरकार शिक्षक अतिरिक्त झाल्याचा कांगावा करीत आहेत. एकीकडे शक्तीपीठ महामार्ग सारखे नको असलेले प्रकल्प बळजबरीने लोकांच्या डोक्यावर मारत आहे. दुसरीकडे शाळा बंद करत शिक्षणाचा हक्कच नाकारत आहे. सरकार शिक्षण हक्क कायद्याच्या उलटा व्यवहार करत आहे. संपूर्ण शिक्षण व्यवस्था खाजगी भांडवलदारांच्या ताब्यात देऊन पुन्हा एकदा बहुजन समाजाला गुलाम करायचे आहे. आपल्याला हा संघर्ष नेटाने लढवावाच लागेल.
अमर चव्हाण म्हणाले, गाव खेड्यातल्या शाळा टिकल्या तरच आमची मुले शिकतील. त्यामुळे हा संघर्ष आता आपल्याला मोठ्या ताकतीने पुढे घेऊन जावा लागेल. संजय तर्डेकर म्हणाले की,आपण यापूर्वी सरकारचा एक निर्णय लढा करून हाणून पाडला आहे. यावेळीही आपल्याला त्याच ताकदीने उभा राहावे लागणार आहे.
कॉम्रेड सम्राट मोरे म्हणाले की, शाळा टिकल्या तर खेड्यापाड्यातील मुले शिकतील. सगळे मिळून तीव्र लढा उभा करूया.
प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले की, सरकारची धोरणे ही भांडवलदारांच्या बाजूची आहेत. सरकारी शाळा मोडून तिथे खाजगी शाळा आणण्याच्या दिशेने सरकार चालले आहे. आपण एकजुटीने हा लढा पुढे नेऊया.
कृष्णा भारतीय म्हणाले की, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची गंगा सामन्यांच्या दारात आणली सरकार आता ती उलटी फिरवत आहे.
कॉम्रेड शिवाजी गुरव म्हणाले की,सरकार शिक्षण व्यवस्थाच मोडत आहे. संघर्ष करावाच लागेल.
यावेळी समन्वय समितीचे अध्यक्ष प्रकाश तिबिले, शिक्षक बँकेचे संचालक शिवाजी बोलके, शिक्षक संघाचे मायकेल फर्नांडिस, राजू होलम, सुरेश शिंगटे, युवराज पोवार, सुभाष निकम यांनीही मनोगते व्यक्त करून या लढयात सर्व शक्तीनिशी उतरण्याचा निर्धार व्यक्त केला. मेळाव्याला आनंदनराव कुंभार, प्रकाश मोरुस्कर, युवराज जाधव, काशिनाथ मोरे, संजय घाटगे, डी.ए.पाटील, संतोष पाटील यांच्यासह आजरा गडहिंग्लज व भुदरगड तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
आजरा येथे झालेल्या शाळा बचाव आंदोलनाच्या मेळाव्यात कोल्हापूरला शिक्षण हक्क लढा परिषद घेण्याचा निर्णय
|