बातम्या

कागल तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा ; शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या निदर्शनाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद

Declaring Kagal taluka drought


By nisha patil - 11/23/2026 3:47:44 PM
Share This News:



कागल तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा ; शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या निदर्शनाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद

कागल प्रतिनिधी : अजित बोडके कागल : कागल तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीने कागल तहसील कार्यालयावर करण्यात आलेल्या निदर्शनाला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तहसीलदारांना स्वतंत्र दोन निवेदने देण्यात आली.

शिवसेना जिल्हा संघटक प्रमुख श्री. संभाजीराव भोकरे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कागल तालुका हा कमी पावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. यंदाही तालुक्यात अत्यंत कमी पाऊस झाला. जून महिना पूर्ण कोरडा गेला. त्यानंतर जुलैमध्ये झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. सुरुवातीला पावसाने थोडी साथ दिल्याने पिके चांगली व जोमाने आली, मात्र पेरणीनंतर पावसाने पुन्हा पाठ फिरवली. त्यामुळे सोयाबीन, भात, भुईमूग, ऊस ही पिके वाळून गेली आहेत. भात पोटरीला येऊन तेथेच थांबला आहे, तर सोयाबीन वाळून गेला आहे, ऊस व भुईमूग वाळत आहे.

या परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी, पिण्याच्या पाण्याची व सर्व जनावरांच्या चाऱ्याची सोय करावी, दुष्काळाचा सामना करण्यासाठी मनरेगाच्या कामाची सोय करावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे. तसेच आमदार, खासदार यांचे वेतन रद्द करून ते दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना द्यावे, मंत्र्यांचीही फी कमी करून त्याचे वेतनही दुष्काळग्रस्तांना द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. तालुका लवकरात लवकर दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा शिवसेना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून धरणे आंदोलन, मोर्चे, निदर्शने अशी आंदोलने करेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या दुसऱ्या निवेदनातही कागल तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे. कमी पावसामुळे तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पेरणी झालेली पिके पावसाअभावी करपून गेली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत, पिक विमा व नुकसान भरपाई तातडीने मिळावी, कर्ज वसुलीला स्थगिती देऊन शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा द्यावा, पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा व रोजगाराच्या कामांची सोय करावी, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

या निदर्शनासाठी कागल तालुक्यातील विविध गावांमधून शेतकरी, महिला शेतकरी, युवक तसेच शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. घोषणाबाजीने तहसील कार्यालय परिसर दणाणून गेला होता.


कागल तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा ; शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या निदर्शनाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद
Total Views: 4