बातम्या
कागल तालुक्यात दुष्काळ जाहीर करा, अन्यथा जनआंदोलन सर्वपक्षीय कार्यकर्ते, शेतकऱ्यांचा निर्वाणीचा इशारा
By nisha patil - 11/26/2026 12:10:17 AM
Share This News:
कागल तालुक्यात दुष्काळ जाहीर करा, अन्यथा जनआंदोलन सर्वपक्षीय कार्यकर्ते, शेतकऱ्यांचा निर्वाणीचा इशारा
सेनापती कापशी :प्रतिनिधी अजित बोडके शासनाने हिवाळी अधिवेशनापूर्वी कागल तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा आणि तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीने दुष्काळाच्या सवलती लागू कराव्यात. अन्यथा हिवाळी अधिवेशनात नागपूर विधानभवनावर शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा काढण्यात येईल. तसेच सोमवार, दि. ३० जून रोजी सकाळी संताजी चौक, कापशी येथे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्षवेधी रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल.
असा इशारा चिकोत्रा खोऱ्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी कागल तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी कापशी येथे आयोजित ठिय्या आंदोलनातून दिला आहे. याबाबत आंदोलकांनी प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून मंडल अधिकारी खटावकर यांना सविस्तर निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यातील २६५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील अन्य तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, कागल तालुका हा अतिवृष्टीचा तालुका म्हणून दुष्काळाच्या यादीतून वगळण्यात आला आहे. ही बाब अत्यंत अन्यायकारक आहे.
प्रत्यक्ष परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. शासनाने सिंचन प्रकल्पांमधील उपलब्ध पाणी, पीक पेरणीची परिस्थिती तसेच यावर्षी सरासरी ७५० मि.मी. पाऊस अपेक्षित असताना केवळ ४२० मि.मी. पर्जन्यमान झाले, याचा वस्तुनिष्ठ आढावा न घेता केवळ तालुक्यातील पारंपरिक पर्जन्यमान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना दुष्काळाच्या लाभापासून वंचित ठेवले आहे.
तालुक्यातील पश्चिम भागातील चिकोत्रा नदी खोऱ्यातील ३० ते ३५ गावे डोंगराळ, तीव्र उताराची आणि कमी पर्जन्यमानाची असल्यामुळे खरीप हंगामातील पावसावर अवलंबून असलेले सोयाबीन व भात पीक पूर्णपणे वाळून, करपून गेले आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनची दुबार पेरणी करूनही भरणीच्या वेळी पाऊस न झाल्यामुळे व तांबेरा रोगामुळे दाण्याला वजनच आले नाही. एकरी ३ क्विंटलपेक्षाही कमी उतारा मिळाला आहे.
चिकोत्रा प्रकल्पात पावसाळ्याच्या सुरुवातीस ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे यावर्षी धरणात केवळ ६२ टक्केच पाणी जमा झाले. परिणामी सोयाबीन, भात, मका, भुईमूग या खरीप पिकांचे ७५ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. ऊस पिकाची वाढ पूर्णपणे खुंटली आहे. अपुऱ्या पाण्यामुळे भविष्यातील ऊस लागणीवरही अनिष्ट परिणाम होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने न भरल्याने ऐन उन्हाळ्यात उपसा बंदी करावी लागते. तसेच ५२ गावांचा पाणीप्रश्न निर्माण होतो. चारा टंचाईमुळे जनावरांचे हाल होत आहेत.
तालुक्यातील दूधगंगा, वेदगंगा नदीवरील मध्य व पूर्व भागातील ४५ ते ५० गावांमध्ये विविध अवस्थेत खरीप पिकांसाठी पोषणयुक्त पर्जन्यमान झाले नाही. त्यामुळे पीक आणेवारी अत्यंत कमी झाली आहे. पूर्वेकडील सिद्धनेर्ली, कागल महसूल मंडळे कमी पर्जन्यमानामुळे पूर्णपणे दुष्काळसदृश झाली आहेत.
तालुक्यातील वेदगंगा व चिकोत्रा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे नादुरुस्त असून त्यात पाणी टिकत नाही. तालुक्यातील लघु पाटबंधारे तलावांमध्ये केवळ २० ते २५ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी याच वेळी ७० टक्के साठा होता.
या ठिय्या आंदोलनासाठी मिलिंद देशपांडे, तुकाराम भारमल, अॅड. दयानंद पाटील-नंद्याळकर, दत्तोपंत वालवालकर, सागर मोहिते, दिलीप तिप्पे, धनाजी सेनापतीकर, आनंदा घोरपडे, विनायक उर्फ गोपी पवार, प्रदीप चव्हाण, अण्णाप्पा तिप्पे, संतोष तिप्पे, निलेश शिंदे, मोहन मोरे, वैभव पाटील, रंगराव मेतके, संजय बरकाळे, राम चेचर, दिलीप पाटील, सचिन पडवळे, रमेश कोगे, विनायक पवार, पांडुरंग मोहिते, संजय शिंदे, मारुती कुंभार, ईश्वर सोळंकुरे, संदीप चौगुले, बाबासो डोने, श्रीपती तोरसे, मारुती पाटील, प्रवीण कुराडे, शिवाजी नाईक, महादेव पोतदार, वसंत तशिलदार, अरविंद खामकर, दिलावर देसाई, नेताजी ढेरे, सुभाष मोरे, अंबाजी कामते आदी उपस्थित होते.
कागल तालुक्यात दुष्काळ जाहीर करा, अन्यथा जनआंदोलन सर्वपक्षीय कार्यकर्ते, शेतकऱ्यांचा निर्वाणीचा इशारा
|