बातम्या
पंचगंगा घाटावर शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे 'दीपोत्सव २०२६' उत्साहात संपन्न
By nisha patil - 11/24/2026 6:20:49 PM
Share This News:
पंचगंगा घाटावर शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे 'दीपोत्सव २०२६' उत्साहात संपन्न
५१ हजार पणत्यांच्या तेजोमय प्रकाशाने घाट उजळून निघाला; हजारो भाविकांची मध्यरात्रीपासून उत्स्फूर्त उपस्थिती
कोल्हापूर (प्रतिनिधी) : त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून जुना बुधवार पेठ येथील शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने पंचगंगा घाट परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही 'दीपोत्सव २०२६' अत्यंत भव्य आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. मंगळवारी पहाटे ३.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते प्रथम दीपप्रज्वलन करून या दिव्य सोहळ्याचा शुभारंभ झाला. त्यानंतर अवघ्या काही वेळातच संपूर्ण घाट परिसरात ५१ हजार पणत्या प्रज्वलित करण्यात आल्याने पंचगंगा नदीकिनारा तेजोमय प्रकाशात न्हाऊन निघाला.
सांस्कृतिक कार्यक्रम आणि रक्तदान शिबिराला प्रतिसाद
दीपोत्सवाच्या पूर्वसंध्येला सोमवारी रात्री विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गीतांजली ग्रुपचा कराओके कार्यक्रम तसेच रसिकांसाठी 'ओपन कराओके स्टेज' उपलब्ध करून देण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी जपत प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले, ज्याला तरुणाईने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पहाटे रांगोळ्यांचे आकर्षक प्रदर्शन, भव्य आतषबाजी आणि परिसरातील प्राचीन मंदिरांवर केलेल्या नेत्रदीपक विद्युत रोषणाईमुळे वातावरण अधिकच उत्साहपूर्ण बनले होते. पहाटे ५ वाजता आकार प्रस्तुत 'अंतरंग' या मराठी भाव, भक्ती व चित्रपट गीतांच्या बहारदार मैफिलीने (निर्माते : महेश हिरेमठ यांचा वाद्यवृंद) उपस्थितांची मने जिंकली.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याप्रसंगी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, नगरसेवक राहुल माने, डॉ. प्रवीण कोडोलीकर, भाजपचे माजी महानगराध्यक्ष संदीप देसाई, अजिंक्य आपके (सर), ऐश्वर्या मुनीश्वर, प्रताप जाधव, प्रकाश गवंडी, नेपोलियन सोनुले, राजेंद्र करंबे, अनिरुद्ध कोल्हापुरे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले.
चौकट (कोट्स):
"पंचगंगा घाटावरील दीपोत्सव हा आता कोल्हापूरच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग बनला आहे. श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा हा लोकोत्सव जनतेच्या सहभागातूनच यशस्वी होत आहे. विविध तरुण मंडळे व सामाजिक संस्थांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अधिक व्यापक रूप घेत आहे. या सोहळ्याला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व कोल्हापूरकरांचे मनःपूर्वक आभार."
— दिपक देसाई (शिवमुद्रा प्रतिष्ठान)
कार्यकर्त्यांचे विशेष परिश्रम
पौर्णिमेच्या लख्ख चंद्रप्रकाशात प्रज्वलित झालेल्या हजारो पणत्यांचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी मध्यरात्रीपासूनच पंचगंगा घाटावर मोठी गर्दी केली होती. या संपूर्ण दीपोत्सवाच्या यशस्वी नियोजनासाठी अक्षय मिठारी, अतुल वस्ताद, प्रज्वल चेने, निलेश जाधव, प्रवीण चौगुले, विनोद हजारे, ऋतुराज पाटील, रोहित शेट्टी, अवधूत कोळी यांच्यासह ईशा वस्ताद, श्रुती जाधव, गीता चौगुले, सुनीता दळवी, सुनीता मांडवकर आणि अर्चना पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
पंचगंगा घाटावर शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे 'दीपोत्सव २०२६' उत्साहात संपन्न
|