बातम्या
महाराष्ट्रातील पोलिसांसाठी आठ तासांची ड्युटी शिफ्ट सक्तीने लागू करण्याची मागणी
By nisha patil - 6/10/2025 4:11:59 PM
Share This News:
महाराष्ट्रातील पोलिसांसाठी आठ तासांची ड्युटी शिफ्ट सक्तीने लागू करण्याची मागणी
हिंदू जनसंघर्ष समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
कोल्हापूर │ महाराष्ट्रातील सर्व पोलिसांसाठी आठ तासांची ड्युटी शिफ्ट सक्तीने लागू करण्यात यावी, अशी मागणी हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच गृह मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पोलिसांच्या मानवी हक्कांचे, आरोग्याच्या हक्काचे आणि संविधानिक संरक्षणाचे उल्लंघन सध्याच्या कामकाज पद्धतीत होत असल्याचा समितीचा आरोप आहे.
समितीने सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पोलिसांना आजही 12 ते 14 तास सलग कर्तव्य बजावावे लागते. सुट्ट्या न मिळाल्याने त्यांच्या आरोग्यावर, मानसिक संतुलनावर आणि कौटुंबिक जीवनावर गंभीर परिणाम होत आहेत. अतिताणामुळे पोलिसांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण वाढले असून, हृदयरोग, मधुमेह आणि नैराश्य यांसारख्या आजारांचे प्रमाणही वाढत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
संविधानाच्या कलम 21 व 42 अंतर्गत पोलिसांना सन्मानपूर्वक आणि तणावमुक्त जीवनाचा हक्क मिळणे आवश्यक असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. तसेच कारखाना अधिनियम 1948 प्रमाणे इतर कर्मचाऱ्यांना जशी आठ तास कामाची मर्यादा आहे, तशीच सुविधा पोलिसांनाही देणे आवश्यक असल्याचा मुद्दा मांडण्यात आला आहे.
समितीने आपल्या मागण्यांमध्ये –
1. महाराष्ट्रातील सर्व पोलिसांसाठी सक्तीची आठ तासांची शिफ्ट प्रणाली लागू करणे,
2. सकाळ, दुपार, रात्र अशा तीन शिफ्टची अंमलबजावणी करणे,
3. मनुष्यबळ वाढवण्यासाठी अतिरिक्त भरती करणे,
4. पोलिसांच्या आरोग्य व मानसिक तणाव कमी करण्यासाठी स्वतंत्र आरोग्य व कल्याण योजना सुरू करणे,
5. यासंदर्भात शासनाने तातडीने आदेश जारी करणे – या बाबींचा समावेश केला आहे.
केरळ राज्याने 2021 मध्ये अशी तीन शिफ्ट प्रणाली सुरू करून सकारात्मक परिणाम मिळवले आहेत, असे उदाहरण देत महाराष्ट्र सरकारनेही तातडीने हा निर्णय घ्यावा अशी मागणी समितीने केली आहे.
ही मागणी केवळ पोलिसांच्या हितासाठी नसून जनहितासाठीही आहे, कारण तणावग्रस्त व थकलेला पोलीस जनतेचे योग्य रक्षण करू शकत नाही, असेही समितीने स्पष्ट केले आहे. शासनाने ही मागणी न मानल्यास जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही समितीने दिला आहे.
या निवेदनावेळी श्री. अभिजीत विलास पाटील, श्री. वविहाग रविकास कबुटे, श्री. राजेंद्र शिवाजीराव तीरस्कार, श्री. संभाजी हिंदुत्व बोटवत, श्री. महेश विजयताव पोवाट, श्री. अजय क्षेकर सोनवणे, श्री. सुरेश नाच्य आणि श्री. श्रीकांत पाटील हे प्रमुख उपस्थित होते.
ठिकाण : कोल्हापूर
संस्था : हिंदू जनसंघर्ष समिती
महाराष्ट्रातील पोलिसांसाठी आठ तासांची ड्युटी शिफ्ट सक्तीने लागू करण्याची मागणी
|