बातम्या
जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानंतर सैनिक टाकळी एमआयडीसीचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी
By nisha patil - 11/26/2026 12:08:25 AM
Share This News:
जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानंतर सैनिक टाकळी एमआयडीसीचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आंदोलकांचे निवेदन; उद्योगमंत्री उदय सामंत यांचीही घेतली भेट
मुंबई: सैनिक टाकळी येथील गायरान गट नं. ११९४ व १३५० या जमिनीवर प्रस्तावित एमआयडीसी उभारण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या माजी सैनिक, शेतकरी, शेतमजूर व पूरग्रस्त नागरिकांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे.
जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालातील निष्कर्षांच्या आधारे ही मागणी करण्यात आली आहे.
प्रस्तावित सैनिक टाकळी एमआयडीसीच्या विरोधात २०२३ पासून परिसरातील माजी सैनिक, शेतकरी, शेतमजूर व पूरग्रस्त नागरिक आंदोलन करत आहेत. वेळोवेळी निवेदने, आंदोलने व मोर्चांच्या माध्यमातून ग्रामस्थांनी आपला विरोध नोंदविला आहे. आंदोलनादरम्यान झालेल्या निर्णयानुसार दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी उद्योग मंत्रालय, मुंबई येथे बैठक पार पडली होती. या बैठकीत सैनिक टाकळी येथील गायरान गट नं. ११९४ व १३५० या जमिनीची एकूण उपलब्धता, सद्यस्थिती आणि एमआयडीसी प्रक्रियेत वापरण्यात आलेल्या ग्रामसभा ठरावाची सत्यता तपासून अहवाल सादर करण्याचे ठरले होते.
त्यानुसार जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांनी सखोल चौकशी व प्रत्यक्ष पाहणी करून दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी मंत्रालयाकडे अहवाल सादर केला. या अहवालानुसार प्रस्तावित एमआयडीसीसाठी गायरान जमीन दिल्यानंतर गावाच्या विकासासाठी केवळ १७.३३ हेक्टर जमीन शिल्लक राहणार आहे. गावाच्या एकूण महसुलाचा विचार करता विकासासाठी किमान पाच टक्के गायरान जमीन शिल्लक राहणे आवश्यक आहे प्रस्तावित जमीन हस्तांतरणामुळे या निकषाचे उल्लंघन होत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
तसेच एमआयडीसी प्रक्रियेत वापरण्यात आलेला दि. २९ ऑगस्ट २०२३ रोजीचा ग्रामसभा ठराव महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ मधील कलम ७ व संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार झालेला नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालात नमूद असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे या ठरावाच्या वैधतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. याशिवाय गायरान गट नं. ११९४ व १३५० या जमिनीची महसूल विभागाकडून अद्याप मोजणी व हस्तांतरण झालेले नाही
या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी आज उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले. सैनिक टाकळी येथील गायरान जमिनीवर औद्योगिक क्षेत्र उभारण्याबाबत घेतलेला निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.
गायरान जमीन गावाच्या सार्वजनिक वापरासाठी, सैनिक स्कूल, क्रिडा संकुल ,जनावरांच्या चराईसाठी, पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आणि भविष्यातील विकासासाठी राखीव ठेवावी . तसेच शासन निर्णय रद्द होईपर्यंत जमीन हस्तांतरण व पुढील औद्योगिक कार्यवाहीला स्थगिती द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, लेफ्टनंट विजय गायकवाड, कॅप्टन प्रकाश खोत, वकील सीताराम पाटील, श्रीधर भोसले, नवनाथ पाटील, सुरेश भोसले आदी उपस्थित होते.
“जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालातून आमच्या मागणीला कायदेशीर आधार मिळाला आहे. त्यामुळे शासनाने अहवालाची गांभीर्याने दखल घेऊन सैनिक टाकळी एमआयडीसीचा निर्णय रद्द करावा,” अन्यथा मंत्रालयाच्या दारात आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला .
जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानंतर सैनिक टाकळी एमआयडीसीचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी
|