विशेष बातम्या
बांधकाम कामगारांच्या हक्कांसाठी निर्धार: तिरंगा रॅलीतून कृती समितीचा बुलंद आवाज – गुणवंत नागटिळे
By nisha patil - 5/30/2025 4:05:20 PM
Share This News:
बांधकाम कामगारांच्या हक्कांसाठी निर्धार: तिरंगा रॅलीतून कृती समितीचा बुलंद आवाज – गुणवंत नागटिळे
कोल्हापूर: महाराष्ट्र राज्य बांधकाम श्रमिक कामगार कृती समितीच्या वतीने आज राजर्षी शाहू स्मारक भवन येथे बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कांसाठी निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. मेळाव्यापूर्वी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व सैनिकांच्या कार्याचं कौतुक करण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. शाहू समाधीस्थळ ते शाहू स्मारक भवन दरम्यान काढण्यात आलेल्या या रॅलीत हजारो बांधकाम कामगारांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या मेळाव्याचं उद्घाटन दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आलं. अध्यक्ष गुणवंत नागटिळे यांनी बांधकाम कामगारांच्या हक्कांसाठी भविष्यात मोठा संघर्ष छेडण्याचा निर्धार व्यक्त केला. “शासनाने बंद केलेलं कामगार पोर्टल आमच्या उपोषणामुळे पुन्हा सुरू झालं, ही आमच्या एकजुटीची ताकद आहे,” असं ते म्हणाले.
मुख्य मागण्या:
-
कामगारांच्या मुलांना 1 ली ते 10 वीपर्यंत टॅब, व उच्च शिक्षणासाठी लॅपटॉप मोफत द्यावेत.
-
कामगार मंडळात कृती समितीतील कामगार प्रतिनिधींचा समावेश करावा.
-
प्रलंबित घरकुल योजना तात्काळ मार्गी लावावी.
-
उपचारासाठी असलेली नोंदणी अट रद्द करावी.
-
मयत कामगारांसाठी स्वतंत्र पोर्टल सुरू करावे.
-
जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापन करावी.
कार्यक्रमात अमोल कुंभार, तानाजी तावडे, संजय धुमाळ, सर्जेराव कांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनासाठी उपोषण करणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. मेळावा 'न्याय हक्कांसाठी अखंड संघर्ष' या निर्धाराने संपन्न झाला.
बांधकाम कामगारांच्या हक्कांसाठी निर्धार: तिरंगा रॅलीतून कृती समितीचा बुलंद आवाज – गुणवंत नागटिळे
|