शैक्षणिक
देवाशिष लॉ कॉलेजचा ‘कायदा’च बेकायदेशीर! — ४९ विद्यार्थी डिटेन,
By nisha patil - 7/10/2025 11:19:15 AM
Share This News:
निपाणी सीमाभागातील अर्जुननगर येथील देवाशिष लॉ कॉलेजचा बेजबाबदार आणि गोंधळलेला कारभार अखेर उघड झाला आहे. कॉलेजमधील तब्बल ४९ विद्यार्थ्यांना हजेरी अपुरी असल्याच्या कारणावरून एक वर्षासाठी डिटेन करण्यात आले असून, या गंभीर प्रकाराला जबाबदार असलेल्या कॉलेज प्रशासनावर मात्र आजपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांपैकी अनेकजण शासकीय नोकरीत कार्यरत आहेत. प्रवेश घेताना कॉलेजने कोणत्याही अटी, नियमावली, किंवा हजेरीची स्पष्ट जबाबदारी विद्यार्थ्यांकडून घेतली नव्हती. मात्र आता विद्यापीठाने हजेरी अपुरी असल्याचा आधार घेत विद्यार्थ्यांवरच कारवाई केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने या संपूर्ण गोंधळाचा पर्दाफाश केला आहे. जानेवारी २०२५ मध्येच मनसेने शिवाजी विद्यापीठाकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीत कॉलेज प्रशासनावर खालील गंभीर आरोप करण्यात आले होते –
👉 सरकारी नोकरदारांना विशेष मर्जी दाखवून प्रवेश देणे,
👉 हजेरी पत्रकांमध्ये खोटी नोंद करणे,
👉 कृत्रिमरीत्या ७५ टक्के हजेरी दाखवणे.
या आरोपांवर शिवाजी विद्यापीठाने चौकशी समिती नेमली होती. समितीच्या अहवालानुसार, कॉलेजमध्ये हजेरी पत्रकांमध्ये छेडछाड आणि व्यवस्थापनाचा बेपर्वा कारभार असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, विद्यापीठाने कारवाई विद्यार्थ्यांवर केली, कॉलेज प्रशासनावर नाही!
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिक्षण वर्तुळातून विद्यापीठ आणि शासनाकडे कॉलेज प्रशासनाविरुद्ध तात्काळ कारवाईची मागणी होत आहे.
देवाशिष लॉ कॉलेजचा ‘कायदा’च बेकायदेशीर! — ४९ विद्यार्थी डिटेन,
|