बातम्या

स्पर्धा परीक्षेच्या तयारीतून निश्चित व्यक्तिमत्त्व विकास - जिल्हाधिकारी अमोल येडगे

Development of definite personality through preparation for competitive exams


By nisha patil - 11/21/2025 3:11:52 PM
Share This News:



स्पर्धा परीक्षेच्या तयारीतून निश्चित व्यक्तिमत्त्व विकास - जिल्हाधिकारी अमोल येडगे

’युवा संवाद’ च्या दुसऱ्या टप्प्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

कोल्हापूर, दि. २१ : स्पर्धा परीक्षेत प्रत्येकालाच यश मिळत नाही, मात्र स्पर्धा परीक्षेच्या तयारीतून प्रत्येक अभ्यासू विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्त्व विकास निश्चितच होतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. दर महिन्याला आयोजित होणाऱ्या ‘युवा संवाद’ कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी तथा सत्कारमूर्ती अपूर्वा पाटील, सतेज पाटील, सायली भोसले तसेच विविध महाविद्यालयांतील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘युवा संवाद’ कार्यक्रमातून युवकांना स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन केले जाते. या मालिकेची सुरुवात आयपीएस अधिकारी बिरदेव डोणे यांच्या मार्गदर्शनाने झाली होती. आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, विद्यार्थ्यांनो, अभ्यास करताना ध्येय निश्चित करा, स्वयंशिस्त पाळा, आत्मविश्वास ठेवा आणि चांगले नियोजन करून पुढे जा. यासाठी ‘प्लॅन ए’ आणि ‘प्लॅन बी’ दोन्ही तयार ठेवा. सर्वच अभ्यासू विद्यार्थी यशस्वी होऊ शकतीलच असे नाही. त्यामुळे अभ्यासाचा कालावधी ठरवून त्यानंतर दुसरा पर्याय निवडा. प्रत्येकाची अभ्यासपद्धती वेगळी असते; सर्वांकडून प्रेरणा घ्या आणि स्वतःची अनोखी पद्धत विकसित करा. सुरुवातीपासूनच स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्याचा पूर्ण संकल्प करून तयारीला उतरा आणि स्पर्धेदरम्यान नेहमी संयम ठेवा.

उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले यांनी अभ्यासादरम्यान सोशल मीडियापासून दूर राहत, समाजात फक्त ‘मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय’ असे सांगत फिरू नका असा सल्ला दिला. ते म्हणाले, शांतपणे तयारी करा आणि यश मिळाल्यावर सर्वांना सांगा. मित्र जे करतात तेच आपण करावे असा मोह टाळा आणि एकाग्रता वाढवा. कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या तयारीचे अनुभव कथन केले. एमपीएससी उत्तीर्ण अपूर्वा पाटील यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, अपयशाला घाबरू नये आणि नियमित पुनरावृत्तीचा सल्ला दिला. सायली भोसले यांनी चांगला मार्गदर्शक असणे गरजेचे असल्याचे आणि सातत्य ठेवण्याबाबत सांगितले. सतेज पाटील यांनी अभ्यासातील सातत्याला आत्मविश्वासाची जोड देण्याचा सल्ला दिला. शेवटी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मार्गदर्शकांनी उत्तरे दिली.


स्पर्धा परीक्षेच्या तयारीतून निश्चित व्यक्तिमत्त्व विकास - जिल्हाधिकारी अमोल येडगे
Total Views: 27