बातम्या
कोल्हापूरसह १३ गावांच्या विकासाचा आराखडा! जिल्हाधिकाऱ्यांकडून कामांचा आढावा
By nisha patil - 11/19/2026 8:34:00 PM
Share This News:
कोल्हापूरसह १३ गावांच्या विकासाचा आराखडा! जिल्हाधिकाऱ्यांकडून कामांचा आढावा
कोल्हापूर शहरासह लगतच्या १३ गावांमधील विकासकामांना आता गती मिळण्याची शक्यता आहे. पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, रस्ते, भूसंपादन आणि विविध प्रलंबित प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार अमल महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. यावेळी उचगाव, पाचगाव, मणेर मळा, आर. के. नगर आणि मोरेवाडीसह १३ गावांच्या पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेण्यात आला.
या योजनेअंतर्गत ३२ नवीन पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार असून, नऊ टाक्यांची कामे पूर्ण झाली आहेत, तर १३ टाक्यांची कामे सुरू आहेत. योजनेचा पहिला टप्पा मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. दरम्यान, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील ३५ गावांच्या कचरा व्यवस्थापनासाठी एकत्रित प्रकल्प उभारण्याबाबतही चर्चा झाली. शिंगणापूर बंधाऱ्यामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना भरपाई मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचे ठरले.
याशिवाय कनेरीवाडीतील भूसंपादनाचा मोबदला, चव्हाणवाडी-न्यू वाडदे येथील अतिक्रमणे, विमानतळ वळण रस्ता, तामगाव-उजळाईवाडी रस्ता, कामगार भवन, सहकार भवन आणि विविध गावांतील क्रीडांगणांच्या प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली.
कोल्हापूरसह १३ गावांच्या विकासाचा आराखडा! जिल्हाधिकाऱ्यांकडून कामांचा आढावा
|