बातम्या

शेंडूरमध्ये पारंपारिक वाद्यांच्या गजरात गणरायाचे भक्तिमय आगमन

Devotional arrival of Lord Ganesha in Shendur


By nisha patil - 9/15/2026 3:43:18 PM
Share This News:



शेंडूरमध्ये पारंपारिक वाद्यांच्या गजरात गणरायाचे भक्तिमय आगमन

डॉल्बीला फाटा देत तरुण मंडळांनी जपली परंपरा

कागल प्रतिनिधी : अजित बोडके शेंडूर (ता. कागल) - कागल तालुक्यातील शेंडूर गावात यंदा पारंपारिक वाद्यांच्या निनादात मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात गणपती बाप्पाचे आगमन झाले. गावातील तरुण मंडळांनी आधुनिक डॉल्बीला फाटा देत पारंपारिक वाद्यांना पसंती दिल्याने संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेले.

गणेश आगमन मिरवणुकीत माळवाडी येथील प्रसिद्ध राजे ग्रुपने बेंजोच्या तालावर ठेका धरत मिरवणुकीची शोभा वाढवली. तर शाहू तरुण मंडळाने पारंपारिक दिंडीच्या नादात बाप्पाचे स्वागत केले. 

जय भारत तरुण मंडळ आणि जय शिवराय तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लेझीमचा ठेका धरत गणेश आगमनात उत्साह भरला. लेझीम, दिंडी आणि बेंजोच्या ठेक्यावर तरुणाईसह अबालवृद्धांनी मोठ्या जल्लोषात नृत्य केले.

पारंपारिक वाद्यांचा वापर करून पर्यावरणपूरक आणि शांततेत मिरवणूक काढण्याचा आदर्श या मंडळांनी घालून दिला आहे. ढोल-ताशांच्या गजरात आणि 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


शेंडूरमध्ये पारंपारिक वाद्यांच्या गजरात गणरायाचे भक्तिमय आगमन
Total Views: 54