बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये संवाद लेखकाशी उपक्रम संपन्न
By Administrator - 1/13/2026 5:54:24 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये संवाद लेखकाशी उपक्रम संपन्न
कोल्हापूर दि.13: निसर्ग आणि मानव यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. त्याचबरोबर सद्याच्या काळात कृत्रिम बुध्दीमत्तेचे महत्व वाढते आहे. अशा काळात माणसाने मेंदूचा वापर करुन माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे. युवा पिढी मोबाईलच्या कहयात गेली आहे. या युवा पिढीने वाचनाकडे लक्ष देऊन विवेकाचा अंगिकार करावा. तरुण लेखकांनी आपली मुळ संस्कृती विसरता कामा नये. इतरांचे अनुकरण न करता वेगळया वाटा धुंडाळायला हव्यात. लेखनासोबत लेखकाकडे जबाबदारी येत असते. सामाजिक अस्वस्थता लेखकाला लिहिण्यास प्रवृत्त करीत असते, असे मत डिअर तुकोबा या प्रसिध्द पुस्तकाचे लेखक आणि बीबीसी या न्यूज चॅनेलचे पत्रकार मा.विनायक होगाडे यांनी मांडले. ते विवेकानंद कॉलेजमधील इंग्रजी विभाग, वाड्.मय मंडळ आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संवाद लेखकाशी या उपक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. संजय थोरात हे होते. याप्रसंगी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) च्या समन्वयक डॉ.श्रुती जोशी यांची विशेष उपस्थिती होती.
अध्यक्षीय मनोगतात प्र.प्राचार्य डॉ. संजय थोरात यांनी साहित्य हा समाजाचा आरसा असतो. साहित्याच्या माध्यमातून लेखक मानवी भावना व्यक्त करीत असतो. साहित्य आपल्याला नवनवीन विचार देत असते. साहित्यातून आपल्याला इतिहास, संस्कृती याची जाणीव होत असते. परंतु दुर्दैवाने आजच्या डिजीटल युगात साहित्य वाचन कमी होत आहे. पुस्तकांची जागा मोबाईल आणि टीव्हीने घेतली आहे. अशावेळी तरुणांनी अशा उपक्रमांचा आस्वाद घ्यावा. विवेकानंद कॉलेज हे एक त्यासाठी चांगले व्यासपीठ आहे. यातूनच विद्यार्थ्यांनी आपले चांगले करिअर घडवावे, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थनेने झाली. प्रास्ताविक इंग्रजी विभागप्रमुख डॉ.कविता तिवडे यांनी केले. पाहुण्यांची ओळख कु. सानिका पलंगे हिने करुन दिली. आभार पार्थ पोवार याने मानले. सुत्रसंचालन कु. संजना पाटील हिने केले. या कार्यक्रमास डॉ.सुप्रिया पाटील, डॉ.स्नेहल वरेकर, डॉ.प्रदीप पाटील, डॉ.दीपक तुपे, डॉ.अवधूत टिपुगडे, डॉ.सिध्दार्थ कट्टीमनी, डॉ.आरिफ महात, प्रा सनी काळे इ.प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
विवेकानंद कॉलेजमध्ये संवाद लेखकाशी उपक्रम संपन्न
|