बातम्या

डिजिटल युग हे जीवनाचा अविभाज्य भाग : डॉ. सागर डेळेकर

Digital era is an integral part of life


By nisha patil - 12/19/2025 6:15:02 PM
Share This News:



डिजिटल युग हे जीवनाचा अविभाज्य भाग :  डॉ. सागर डेळेकर
 

कोल्हापूर : आजचे डिजिटल युग हे केवळ तंत्रज्ञानापुरते मर्यादित न राहता प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालले आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे (IQAC) संचालक प्रा. डॉ. सागर डेळेकर यांनी केले.
           

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील दूर शिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र (CDOE) आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने PM-USHA योजनेअंतर्गत “विज्ञानाच्या अध्यापन आणि अध्ययनासाठी ई-कन्टेन्ट विकास” या विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.
           

 यावेळी व्यासपीठावर उपकुलसचिव विनय शिंदे, एज्युटेक कॉर्पोरेशनचे तांत्रिक प्रशासक  एकनाथ कोरे, सहायक कुलसचिव  दिलीप मोहाडीकर उपस्थित होते. कार्यशाळेत विविध विद्याशाखांतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
           

डॉ. डेळेकर पुढे म्हणाले की, ऑटोमेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग यांसारख्या तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनपद्धतीत आमूलाग्र बदल घडून येत आहेत. आज डिजिटल टूल्स, अ‍ॅप्स आणि ई-कन्टेन्ट हे दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनले असून, उच्च शिक्षण क्षेत्रात ई-कन्टेन्टला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
         

कार्यशाळेची भूमिका स्पष्ट करताना दूर शिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. कृष्णा पाटील म्हणाले की, ई-कन्टेन्ट विकसित करताना तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त परिणामकारक वापर केला पाहिजे. भविष्यात शिक्षण क्षेत्रात ई-कन्टेन्टचे महत्त्व अधिक वाढणार असून शिक्षकांनी “कन्टेन्ट क्रिएटर” म्हणून स्वतःला सिद्ध करणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.
         

कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात मार्गदर्शन करताना अहिल्यानगर येथील नॉलेज ब्रिज फाउंडेशनचे प्रशिक्षक  भूषण कुलकर्णी म्हणाले की, अलीकडच्या काळात शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एक शिक्षक एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो, अशी अध्यापन पद्धत विकसित होत असून त्यासाठी दर्जेदार ई-कन्टेन्ट निर्मिती अत्यंत आवश्यक आहे. भविष्यात हायब्रीड शिक्षण पद्धतीला विशेष महत्त्व येणार असल्याने कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य व जबाबदारीने वापर कसा करावा, याचे भान शिक्षकांनी ठेवले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
             

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. नितीन रणदिवे यांनी केले. पाहुण्यांची ओळख नाझिया मुल्लाणी, सूत्रसंचालन डॉ. नगिना माळी, तर आभार प्रदर्शन डॉ. चांगदेव बंडगर यांनी केले.


डिजिटल युग हे जीवनाचा अविभाज्य भाग : डॉ. सागर डेळेकर
Total Views: 47