कृषी
महाविस्तार AI अॅपद्वारे शेतीत डिजिटल क्रांती; जिल्ह्यात ७५ हजारांहून अधिक नोंदणी
By nisha patil - 2/21/2026 11:33:18 AM
Share This News:
महाविस्तार AI अॅपद्वारे शेतीत डिजिटल क्रांती; जिल्ह्यात ७५ हजारांहून अधिक नोंदणी
कोल्हापूर :- हवामान बदल, बाजारपेठेतील अस्थिरता तसेच तांत्रिक माहितीच्या अभावामुळे शेतकऱ्यांना विविध आव्हानांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने विकसित केलेले अत्याधुनिक महाविस्तार AI अॅप शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) साहाय्याने तयार करण्यात आलेले हे अॅप शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देते.
मराठी भाषेत उपलब्ध असलेल्या या अॅपमुळे शेतकऱ्यांना रिअल टाइम माहिती, तज्ज्ञांचा सल्ला तसेच आधुनिक शेती पद्धतींबाबत मार्गदर्शन सहज मिळते. अॅपमधील AI चॅटबॉट शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तरे देतो. स्थानिक पातळीवरील रिअल टाइम हवामान अंदाजामुळे पेरणी, कापणी आणि खत व्यवस्थापनाचे अचूक नियोजन करता येते. तसेच स्थानिक व राष्ट्रीय बाजारपेठेतील पिकांचे दर अद्ययावत स्वरूपात उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांना योग्य वेळी विक्रीचा निर्णय घेता येतो.
कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती, अनुदान, कर्जमाफी व पीक विमा योजनांचे तपशील अॅपवर एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. याशिवाय मराठी भाषेतील व्हिडीओंच्या माध्यमातून पिकांची लागवड, खतांचा वापर, कापणी प्रक्रिया तसेच जैविक शेतीबाबत मार्गदर्शन मिळते. अॅपमधील AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकरी पिकांचे फोटो अपलोड करून रोगांचे निदान व त्यावरील उपाय तत्काळ जाणून घेऊ शकतात.
महाविस्तार AI अॅपमुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचत असून चुकीच्या खत किंवा कीटकनाशकांच्या वापरामुळे होणारा खर्च टाळण्यास मदत होते. बाजारभाव व हवामान अंदाजाच्या आधारे योग्य नियोजन करता येत असल्याने उत्पादनात वाढ व उत्पन्नवाढीस हातभार लागण्याची अपेक्षा आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ७५ हजार ६२३ शेतकऱ्यांनी अॅपची नोंदणी केली आहे. संबंधित अॅप https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.mahapocra.mahavistaarai या लिंकवर उपलब्ध असून प्ले स्टोअरवर जाऊन महाविस्तार AI अॅप डाउनलोड करून शेतीतील डिजिटल क्रांतीचा भाग व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.
महाविस्तार AI अॅपद्वारे शेतीत डिजिटल क्रांती; जिल्ह्यात ७५ हजारांहून अधिक नोंदणी
|