बातम्या

अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाला मान्यवरांची भेट

Dignitaries visit book exhibition


By nisha patil - 8/10/2025 4:23:34 PM
Share This News:



अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाला मान्यवरांची भेट

कोल्हापूर,   – अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त कोल्हापूर विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत 3 ते 9 ऑक्टोबर या कालावधीत लोकराज्य मासिकाचे अंक आणि दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

या प्रदर्शनाला आज औद्योगिक न्यायालयाचे प्रशासकीय सदस्य (न्यायाधीश) निलेश मालुंजकर आणि औद्योगिक न्यायालयाचे सदस्य (न्यायाधीश) विजय आदोणे यांनी भेट देऊन पाहणी केली. त्याआधी मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, संजय गांधी योजना विभागाच्या तहसीलदार वनिता पवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांसह इतर मान्यवरांनी देखील प्रदर्शनाची पाहणी केली.

प्रदर्शनाचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाच्या मराठी भाषा विभागाचे प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.

कोल्हापूर विभागाचे उपसंचालक (माहिती) प्रवीण टाके यांनी आवाहन केले आहे की, हे प्रदर्शन 9 ऑक्टोबरपर्यंत कार्यालयीन वेळेत सुरु राहणार असून, ग्रंथप्रेमींनी प्रदर्शनाला भेट देऊन त्याचा लाभ घ्यावा.

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांच्या हस्ते न्या. मालुंजकर व न्या. आदोणे यांना कोल्हापूरच्या पर्यटनाबद्दल माहिती देणारी सचित्र पर्यटन पुस्तिका दिली. याप्रसंगी माहिती अधिकारी फारूक बागवान, सहायक संचालक वृषाली पाटील आणि विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.


अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाला मान्यवरांची भेट
Total Views: 64