बातम्या

अर्थसंकल्पीय अधिवेशनात सीएसआर निधीवरून विधानसभेत चर्चा

Discussion in the Legislative Assembly on CSR Fund in the Budget Session


By Administrator - 5/3/2026 7:30:36 PM
Share This News:



*अर्थसंकल्पीय अधिवेशनात सीएसआर निधीवरून विधानसभेत चर्चा*


“सीएसआर निधीवर चर्चा स्वागतार्ह; मात्र प्रत्यक्ष कामातूनच विकास” – डॉ. युवराज येडूरे

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) निधीच्या वापराबाबत चर्चा रंगत असताना महाराष्ट्र एनजीओ समितीचे अध्यक्ष डॉ. युवराज येडूरे यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
डॉ. येडूरे यांनी सांगितले की, “गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात सीएसआर निधी मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे; मात्र या निधीच्या वापराची सखोल चौकशी किंवा प्रभावी नियोजन करण्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही.”

त्यांनी पुढे सांगितले की, सध्या महाराष्ट्र एनजीओ समितीने पुढाकार घेत विविध जिल्ह्यांमध्ये सीएसआर निधीच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थांमार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. “ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक कल्याणाच्या विविध क्षेत्रांत आम्ही काम करत आहोत. या उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते लोकांच्या समस्या प्रत्यक्ष सोडवताना दिसत आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.
डॉ. येडूरे यांच्या मते, आता हे काम लोकांपर्यंत पोहोचू लागल्यामुळे राजकीय स्तरावरही सीएसआर विषयावर चर्चा होताना दिसत आहे. “सामाजिक क्षेत्रात स्वयंसेवी संस्था प्रभावीपणे काम करत असल्याचे दिसताच विधिमंडळात सीएसआर निधीबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र केवळ चर्चा करून प्रश्न सुटणार नाही,” असे ते म्हणाले.
त्यांनी सांगितले की, यापूर्वीही महाराष्ट्र एनजीओ समितीने राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावानुसार ‘महाराष्ट्र सीएसआर समिती’ स्थापन करून कंपन्या आणि स्वयंसेवी संस्था यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करणारी यंत्रणा उभी करावी.
“जर अशी समिती स्थापन झाली तर कंपन्यांचा सीएसआर निधी योग्य प्रकल्पांपर्यंत पोहोचेल. स्वयंसेवी संस्थांना काम करण्यासाठी संधी मिळेल आणि सामाजिक विकासाला गती मिळेल. यातून महाराष्ट्राचा सामाजिक उत्कर्ष आणि सर्वांगीण विकास साधता येईल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
डॉ. येडूरे यांनी शेवटी सांगितले की, सामाजिक कामाच्या माध्यमातून राज्याच्या विकासात योगदान देणे हा महाराष्ट्र एनजीओ समितीचा उद्देश असून, सरकार आणि उद्योग क्षेत्राने सहकार्य केल्यास सीएसआर निधीचा प्रभावी उपयोग होऊ शकतो.


अर्थसंकल्पीय अधिवेशनात सीएसआर निधीवरून विधानसभेत चर्चा
Total Views: 4