बातम्या
शहाजी महाविद्यालयात १३३ ऊर्जा वार्षिक पारितोषिकांचे वितरण
By Administrator - 3/14/2026 1:30:52 PM
Share This News:
शहाजी महाविद्यालयात १३३ ऊर्जा वार्षिक पारितोषिकांचे वितरण
कोल्हापूर : श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय येथे ऊर्जा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या समारंभात १३३ पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. डी. आर. मोरे उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण होते.
यावेळी बोलताना डॉ. मोरे म्हणाले की, शहाजी महाविद्यालयात दिली जाणारी ऊर्जा पारितोषिके ही महाविद्यालयाची खास ओळख असून देशातील महाविद्यालयांमध्ये हा नाविन्यपूर्ण उपक्रम मानला जातो. २०३५ पर्यंत बहुतेक महाविद्यालये स्वायत्त होऊन पदवी प्रदान करणारी महाविद्यालये बनतील, असेही त्यांनी सांगितले. मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक वाढल्यामुळे राष्ट्रीय उत्पादनातही वाढ झाली असून देशाच्या प्रगतीसाठी ते महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाविद्यालयातील ऊर्जा पारितोषिके, प्रार्थना, अकॅडमिक डायरी, अकॅडमिक कॅलेंडर, ‘शहाजी वार्ता’ तसेच विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. शानेदिवाण म्हणाले की, ऊर्जा पारितोषिकांमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत असून महाविद्यालयातील नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात शहाजी महाविद्यालयाचे वेगळे स्थान निर्माण झाले आहे.
या वेळी वरिष्ठ विभागातील ‘स्टुडंट ऑफ द इयर’ पुरस्कार आदिती अर्जुन कदम व माया विजय शिंदे यांना, तर कनिष्ठ विभागात अजय गजानन मरेकर व ऋतिका राजेश माने यांना प्रदान करण्यात आला. उपक्रमशील प्राध्यापक म्हणून डॉ. आर. डी. मांडणीकर व प्रा. पी. के. पाटील यांचा सन्मान करण्यात आला. गुणवंत सेवक म्हणून दीपक गुरव व अशोक हराळे यांचा सत्कार करण्यात आला.
या समारंभात रोख बक्षिसे, प्रमाणपत्रे व ‘शहाजी वार्ता’चा अंक देऊन गुणवंतांचा गौरव करण्यात आला. तसेच ‘शहाजी वार्ता’च्या २७ व्या अंकाचे प्रकाशन, विविध विभागांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आणि डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत समन्वयक डॉ. शिवाजी रायजादे यांनी केले, तर प्रास्ताविक डॉ. अनिल बलुगडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पी. के. पाटील यांनी केले आणि आभार डॉ. आर. डी. मांडणीकर यांनी मानले.
या उपक्रमास श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था चे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. कार्यक्रमाला प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले, स्टाफ सेक्रेटरी डॉ. डी. के. वळवी, प्रा. सौ. एम. एम. गायकवाड, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहाजी महाविद्यालयात १३३ ऊर्जा वार्षिक पारितोषिकांचे वितरण
|