शैक्षणिक
शहाजी महाविद्यालयात 133 वार्षिक पारितोषिकांचे वितरण
By nisha patil - 12/3/2026 11:11:00 PM
Share This News:
ऊर्जा पारितोषिके हे शहाजी महाविद्यालयाचे वैशिष्ट्य : प्राचार्य डॉ.डी.आर.मोरे
शहाजी महाविद्यालयात 133 वार्षिक पारितोषिकांचे वितरण
कोल्हापूर : श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात देण्यात येणारी ऊर्जा पारितोषिके ही महाविद्यालयाचे वैशिष्ट्य असून देशभरातील महाविद्यालयांमधे हा नाविन्यपूर्ण असा उपक्रम आहे,असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी बी.सी. यू.डी संचालक व महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.डी. आर.मोरे यांनी केले. श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील ऊर्जा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.
यावेळी बोलताना डॉ.डी.आर.मोरे पुढे म्हणाले,2035 पर्यंत सर्व महाविद्यालये ही स्वायत्त होतील व ती डिग्री देणारी महाविद्यालय बनतील. मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण 50% पेक्षा पुढे गेले असून राष्ट्रीय उत्पादनात यामुळेच मोठी वाढ झाली आहे. देशाच्या प्रगतीसाठी हे महत्त्वाचे आहे. महाविद्यालयातील ऊर्जा पारितोषिके, प्रार्थना,अकॅडमिक डायरी,अकॅडमिक कॅलेंडर, शहाजी वार्ता व इतर नावीन्यपूर्ण उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
अध्यक्ष प्राचार्य डॉ. आर.के.शानेदिवाण म्हणाले, शहाजी ऊर्जा पारितोषिकमुळे विद्यार्थ्यांना अधिकची ऊर्जा मिळत आहे. महाविद्यालयातील विविध नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे शहाजी महाविद्यालयाचे शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात एक वेगळे वलय निर्माण झाले आहे.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे दादा यांच्या विचाराने महाविद्यालयाची वाटचाल सुरू आहे.यासाठी सर्वांची साथ मिळत आहे. यावेळी मानाचा स्टुडन्ट ऑफ द इयर हा पुरस्कार वरिष्ठ विभागातील आदिती अर्जुन कदम व माया विजय शिंदे यांना देण्यात आला, तर कनिष्ठ विभागात अजय गजानन मरेकर व ऋतिका राजेश माने यांना देण्यात आला.
उपक्रमशील प्राध्यापक म्हणून डॉ. आर.डी.मांडणीकर व प्रा पि.के.पाटील यांचा सन्मान करण्यात आला.गुणवंत सेवक म्हणून दीपक गुरव व अशोक हराळे यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी 133 पारितोषिकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.रोख बक्षिसे, प्रमाणपत्र, शहाजी वार्ताचा अंक देऊन गुणवंतांचा सत्कार करण्यात आले.
स्वागत समन्वयक डॉ. शिवाजी रायजादे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. अनिल बलुगडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पि.के. पाटील यांनी केले. आभार डॉ. आर. डी.मांडणीकर यांनी मांनले. यावेळी शहाजी वार्ता च्या 27व्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले,तसेच विविध विभागांच्या छायाचित्राचे प्रदर्शन तसेच डिजिटल क्लासरूंमचे उद्घाटन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यशवंतराव चव्हाण यांच्या वरील ग्रंथसंपदेचे प्रदर्शन यावेळी संपन्न झाले. या उपक्रमास श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. यावेळी प्रबंधक रवींद्र भोसले,अधीक्षक मनीष भोसले, स्टाफ सेक्रेटरी डॉ.डी. के. वळवी,प्रा सौ. एम.एम. गायकवाड,सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी,विद्यार्थी विद्यार्थिनींचे पालक उपस्थित होते.
शहाजी महाविद्यालयात 133 वार्षिक पारितोषिकांचे वितरण
|