बातम्या

सीपीआरमध्ये क्षयरुग्णांना पोषण आहार कीट वाटप

Distribution of nutritional food kits


By nisha patil - 12/23/2025 3:21:23 PM
Share This News:



सीपीआरमध्ये क्षयरुग्णांना पोषण आहार कीट वाटप
 

कोल्हापूर, दि. 23 : शासनाने प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियानाची सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस भिसे आणि क्षय व उरोरोगशास्त्र विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन कुंभार यांनी रुग्णालयातील दोन क्षय रुग्णांना व त्यांच्या घरातील व्यक्तींना पोषण आहारासाठी फुड बास्केटची मदत केली. 
 

या क्षयरुग्णांना किमान 6 महिन्यांकरीता सहा किट देण्यात येणार आहेत. त्यातील पहिल्या पोषण आहारासाठी फुड बास्केटची मदत देण्यात आली. यामध्ये बाजरी/ज्वारी तीन किलो, मटकी/वाटाणा किंवा मुगाची डाळ /तुरीची डाळ-दिड किलो, स्वयंपाक तेल-पाव किलो, शेंगदाणे-एक किलो असे एकूण एका महिन्याच्या पोषण आहारासाठी फुड बास्केटची मदत करण्यात आली. हा कार्यक्रम सीपीआर येथे पार पडला.
 

यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. भिसे यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना याव्दारे प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियानातंर्गत 'निक्षय मित्र' होऊन क्षयरुग्णांना व त्यांच्या घरातील व्यक्तींना पोषण आहारासाठी फुड बास्केटची मदत करुन क्षयमुक्त भारतासाठी आपले अमुल्य योगदान द्यावे, असे आवाहन केले.
 

याप्रसंगी वैद्यकीय अधिक्षक डॉ. भूषण मिरजे, क्षय व उरोरोगशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. अनिता सैबन्नावर, कान, नाक, घसाशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. अजित लोकरे, बालरोग विभागाच्या विभागप्रमुख डॉ. संगीता कुंभोजकर, डॉ. नितीन कुंभार, वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीष कांबळे, अधिसेविका श्रीमती भोसले, श्रीमती भिवसे, समाजसेवा अधिक्षक बाजीराव आपटे, महेंद्र चव्हाण, अजित भास्कर यांच्यासह महाविद्यालय व रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


सीपीआरमध्ये क्षयरुग्णांना पोषण आहार कीट वाटप
Total Views: 69