बातम्या

प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभास उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

District Collectors appeal to attend the main Republic Day ceremony


By nisha patil - 1/24/2026 11:21:06 AM
Share This News:



कोल्हापूर  :- २६ जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात दोन हजार विद्यार्थ्यांची भव्य संगीत कवायत तसेच उषाराजे हायस्कूलचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आलेला ‘जागर अंबाबाई’ हा कार्यक्रम प्रमुख आकर्षण ठरणार आहे. हा मुख्य समारंभ पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न होणार असून, या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

दरवर्षी २६ जानेवारी रोजी शाहू स्टेडियम येथे प्रजासत्ताक दिनाचा मुख्य समारंभ आयोजित करण्यात येतो. मात्र, यावर्षी हा समारंभ पोलिस परेड ग्राउंड, कसबा बावडा येथे आयोजित करण्यात आला आहे. शाहू स्टेडियममध्ये फुटबॉलसाठी नव्याने गवताची लागवड करण्यात आली असून, त्याची वाढ अद्याप पूर्ण झालेली नसल्याने प्रशासनाने कार्यक्रमस्थळ बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी, पोलीस गृह विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच शाहू स्टेडियमचे व्यवस्थापक यांनी संयुक्त पाहणी केली. पाहणीनंतर सद्यस्थितीत त्या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम, संचलन तसेच वाहनांची ये-जा करणे शक्य नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे यावर्षीचा मुख्य समारंभ पोलिस परेड ग्राउंड, कसबा बावडा येथे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या बदलाची नोंद घेऊन सर्व नागरिकांनी २६ जानेवारी रोजी सकाळी ९.१५ वाजता पोलिस परेड ग्राउंड, कोल्हापूर येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.


प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभास उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
Total Views: 20