बातम्या
कागलमध्ये जिल्हास्तरीय सभासद नोंदणी आढावा मेळावा उत्साहात
By nisha patil - 5/26/2025 8:44:56 AM
Share This News:
कागलमध्ये जिल्हास्तरीय सभासद नोंदणी आढावा मेळावा उत्साहात पार
कागल, दि. २५: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी मोहिमेला गती देत कोल्हापूर जिल्ह्याला राज्यात अव्वल क्रमांकावर आणा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्ष क्रमांक एक असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कागलमध्ये आयोजित जिल्हास्तरीय सभासद नोंदणी आढावा मेळाव्यात मंत्री मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर होते. मंत्री मुश्रीफ यांनी जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात सामावून घेण्याचा निर्णय गंभीरपणे घेतल्याचे सांगत जूनपासून निधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. मात्र, शासकीय जबाबदाऱ्यांमुळे उत्पन्नवाढीसाठी करवाढ होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
या वेळी जिल्हाध्यक्ष पाटील-आसुर्लेकर यांनी, उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्याने सभासद नोंदणीत राज्यात प्रथम क्रमांक मिळवावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमात प्रताप उर्फ भैय्या माने, महिला जिल्हाध्यक्षा शितल फराकटे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भाषणे केली. व्यासपीठावर प्रकाशभाई पताडे, सतीश पाटील, शशिकांत खोत, चंद्रकांत गवळी, सूर्यकांत पाटील, वसंतराव धुरे, मधुकर जांभळे, जयसिंग चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत युवक जिल्हाध्यक्ष नितीन दिंडे यांनी, प्रास्ताविक तालुकाध्यक्ष विकास पाटील- कुरुकलीकर यांनी केले. सूत्रसंचालन विशाल बेलवळेकर यांनी केले, तर आभार कागल शहराध्यक्ष संजय चितारी यांनी मानले.
पाकिस्तानला धडा शिकवल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन
यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी, "दहशतवाद्यांच्या आडून कुरापत करणाऱ्या पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगला धडा शिकविला," असे सांगत पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा व तिन्ही सैन्यदलांचे अभिनंदन करणारा ठराव मांडला. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात ठरावाला पाठिंबा दिला.
कागलमध्ये जिल्हास्तरीय सभासद नोंदणी आढावा मेळावा उत्साहात
|