बातम्या

ऊसाला ५ हजारांची पहिली उचल जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू नका 

Do not start sugar factories until the first installment


By nisha patil - 9/29/2026 8:18:15 PM
Share This News:



ऊसाला ५ हजारांची पहिली उचल जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू नका 

 मागील हंगामातील दुसरा हप्ता ३०० रुपये देण्याची मागणी; १० नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याची मागणी 

कोल्हापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मागील हंगामातील हिशोबाचा दुसरा हप्ता ३०० रुपये प्रति टन तसेच चालू गळीत हंगामासाठी ५ हजार रुपये प्रति टन पहिली उचल जाहीर केल्याशिवाय साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू करू नये, अशी मागणी साखर सहसंचालक, कोल्हापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
 

गेल्या दहा वर्षांत ऊस उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून, सध्याच्या दरात ऊस शेती शेतकऱ्यांना परवडत नसल्याचा मुद्दा निवेदनात मांडण्यात आला आहे. वाढत्या उत्पादन खर्चामुळे ऊस उत्पादक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली जात असून, तरुण शेतकरी शेतीपासून दूर होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
 

उत्पादन खर्चावर आधारित ऊस दर मिळणे आवश्यक असून, साखरेचा हमीभाव (MSP) ५० रुपये प्रति किलो करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. साखरेचे सध्याचे बाजारभाव तसेच भविष्यातील साखरेची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन शासनाने याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

यावर्षी पाऊसमान कमी असल्यामुळे उसाची वाढ अपेक्षेप्रमाणे झालेली नसून रिकव्हरीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १५ ऑक्टोबरऐवजी १० नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. लवकर गाळप सुरू केल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे ते शासन भरुन देणार आहे का? 
 

त्यामुळे मागील हंगामातील दुसरा हप्ता ३०० रुपये आणि चालू हंगामातील ५ हजार रुपये पहिली उचल जाहीर केल्याशिवाय विभागातील कोणत्याही साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू करू नये, अशी स्पष्ट मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

या मागण्यांवर तातडीने योग्य ती कार्यवाही करून संबंधित कारखान्यांना आवश्यक आदेश द्यावेत. मागण्या मान्य न झाल्यास व्यापक जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही  देण्यात आला आहे. 
यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष राकेश जगदाळे, निवृत्त माजी सैनिक हनुमंत पाटील, नितीन पाटील, नवनाथ पाटील,अमर पाटील इ.शेतकरी उपस्थित होते.


ऊसाला ५ हजारांची पहिली उचल जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू नका 
Total Views: 76