बातम्या

मोबाईल हॅक करतोस का? म्हणत तरुणाला हातोड्याने मारहाण; तिघांना अटक!

Do you hack mobile phones


By nisha patil - 9/10/2026 7:39:10 PM
Share This News:



मोबाईल हॅक करतोस का? म्हणत तरुणाला हातोड्याने मारहाण; तिघांना अटक!

मोबाईल हॅक करत असल्याच्या संशयावरून एका तरुणाचे अपहरण करून त्याला हातोडा आणि लाकडी दांडक्याने मारहाण करत जबरी चोरी केल्याप्रकरणी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तिघांना अटक केली आहे. राजाराम तलाव परिसरात सापळा रचून पोलिसांनी ९ ऑक्टोबर रोजी ही कारवाई केली. १ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास उजळाईवाडी ता. करवीर येथील पार्थ मोहिते याच्या खोलीवर हा प्रकार घडला. फिर्यादी समीर गुलाब शेख वय ३३, रा. नवी वाशी नाका, कोल्हापूर) यांना संशयितांनी तू आमचे मोबाईल हॅक करतोस काय? असे म्हणत हातोडा आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.

त्यानंतर संशयितांनी शेख यांना बोंद्रेनगर (कोल्हापूर) आणि तवंदी घाट (कर्नाटक) येथे नेऊन मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यावेळी त्यांच्याकडून ३२ हजार रुपये रोख रक्कम, ऑनलाइन माध्यमातून १३ हजार ६०० रुपये आणि मोबाईल जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सीपीआर रुग्णालयात दिलेल्या फिर्यादीवरून गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि त्यांच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे राजाराम तलाव परिसरात सापळा रचून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये सलमान अस्लममुहंमद शेख उर्फ पठाण (वय ३४, रा. गोवंडी, मुंबई), हर्षवर्धन गणेश खडगे (वय १९, रा. निप्पाणी, कर्नाटक) आणि रजत सचिन जाधव (वय १९, रा. निप्पाणी, कर्नाटक) यांचा समावेश आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपासासाठी त्यांना गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.


मोबाईल हॅक करतोस का? म्हणत तरुणाला हातोड्याने मारहाण; तिघांना अटक!
Total Views: 13